वादळग्रस्तांकडे प्रशासनाची पाठ; अद्याप पंचनामे झालेच नाहीत

शेती, घरे, वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान

| नेरळ | प्रतिनिधी |

11 एप्रिल रोजी कर्जत तालुक्यात वादळी वार्‍यासह आलेल्या गारपीट पावसाने साळोख ग्रुप ग्रामपंचायतीमधील स्थानिकांच्या घरांचे मोठे नुकसान केले आहे. त्यानंतर शेतकर्‍यांनी स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना याबाबत माहिती दिली आहे. मात्र, अद्याप कोणताही अधिकारी पंचनामे करण्यासाठी पोहोचलेला नाही.


कर्जत तालुक्यात 11 एप्रिल रोजी कळंब आणि कशेळे भागात वादळ आले होते. त्या वादळासोबत अनेक भागात गारपीट झाली आणि त्या गारपिटीमध्ये आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी आलेल्या वादळाने कळंब आणि साळोख ग्रामपंचायतीमधील घरांचे नुकसान झाले आहे. कळंब येथील मुरबाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यायामशाळेच्या शेडवरील पत्रे उडून थेट रस्त्यावर येऊन कोसळले. मात्र, त्यावेळी कोणतेही वाहन अथवा रस्त्याने वाटसरू यांची ये-जा नव्हती आणि त्यामुळे मोठा अपघात झाला नाही. याच भागातील साळोख ग्रुप ग्रामपंचायतीमधील माले कातकरी वाडीमधील कातकरी समाजाच्या रहिवाशांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील चंद्रकांत दशरथ वळवे, पदू जाणू वाघ, रमेश मंगळ वळवे यांच्या घरावरील छपरं उडून गेली असून, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.


याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना फोनद्वारे वादळाने झालेले नुकसानीची पाहणी करण्याची सूचना केली आहे. मात्र, अद्याप कोणताही महसूल विभागाचा अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी साळोख ग्रामपंचायतीमध्ये  पोहोचला नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version