कोकणातील 15 नगरपालिकांवर प्रशासक; अलिबाग, रोहा, श्रीवर्धनचा कारभार मुख्याधिकार्‍यांकडे

माथेरान, खेड, राजपूर प्रांतांकडे
दापोलीत तहसीलदार प्रशासक
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोना विषाणू संसर्ग आणि ओबीसी आरक्षण स्थगिती यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुगं जिल्हयातील पंचवार्षिक मुदत संपलेल्या 15 नगर परिषदांच्या निवडणुका पुढे गेल्याने या सर्व नगर परिषदांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी या पंधराही नगर परिषदांवर त्या त्या ठिकाणी कार्यरत असलेले मुख्याधिकारी तर काही नगर परिषदांवर उपविभागिय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणुका होईपर्यंत सीईच कारभारी
या सर्व नगर परिषदांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत या सर्व नगर परिषदांचे कामकाज हे प्रशासक पहाणार आहेत. रायगड जिल्हयातील नऊ नगर परिषदांची मुदत संपली असून त्यांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे गेल्या आहेत. त्या सर्व नगर परिषदांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अलिबाग, रोहा, श्रीवर्धन या नगर परिषदांवर 27 डिसेंंबर पासून तेथील मुख्याधिकारी यांची प्रशासकीय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुरूड जंजिरा नगरपरिषदेवर 28 डिसेंबरपासून, खोपोली नगर परिषदेवर 30 डिसेंबर पासून तेथील मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाड व पेण नगर परिषदेवर 1 जानेवारी पासून तेथील मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून काम पहाणार आहेत. तर माथेरान आणि उरण नगर परिषदेवर त्या ठिकाणी कार्यरत असलेले उपविभागिय अधिकारी हे 1 जानेवारी पासून प्रशासक म्हणून काम पहाणार आहेत.

रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीसह पंचवार्षिक मुदत संपलेल्या रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या पाच ठिकाणी प्रशासक राजवट येणार आहे. यातील दापोली नगर पंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली आहे. मात्र उर्वरित जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणर आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून 25 डिसेंंबर पासून तेथील तहसीलदार यांच्याकडे पद्भार देण्यात आला आहे. तर रत्नागिरी व चिपळूण नगर परिषदेत तेथील मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजापूर आणि खेड नगर परिषदांवर तेथील उपविभागिय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण नगर परिषदेवर यापुर्वी उपविभागिय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, ती रद्द करून आता नव्याने या ठिकाणी 21 डिसेंबर पासून तेथील मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तशा आशयाचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी 27 डिसेंबर रोजी जारी केले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोकणातील या सर्व नगर परिषदांवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे.

Exit mobile version