| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची मुदत संपली असून, या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक पाहात आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील जनहिताचे काही प्रश्न आजही रेंगाळत पडले असल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
उरण तालुक्याचे औद्योगिकरण व नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम हे तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे करत आहेत. मात्र तालुक्यातील विंधणे, बांधपाडा, मोठी जुई, हनुमान कोळीवाडा कोप्रोली, सोनारी, चाणजे, केगाव, गोवठणे, फुंडे, म्हातवली, नागाव, वेश्वी, आवरे आदी 14 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्यातील विंधणे, बांधपाडा, मोठी जुई, हनुमान कोळीवाडा, कोप्रोली या ग्रामपंचायतींची मुदत ही दोन वर्षांअगोदरच संपल्याने प्रशासक कामकाज पाहात आहेत. एकंदरीत, 2025-26 या वर्षात मुदत संपलेल्या तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीचा कारभार हा प्रशासक पाहात असल्याने स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अनुपस्थितीत गावपातळीवरील विकासकामे रेंगाळत पडत आहेत. तरी, शासनाने सदर ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच लवकर पार पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.







