ज्युनिअर केजीच्या वर्गासाठी प्रवेश अर्ज मिळणार

पालिकेच्या निर्णयाचे पनवेलकरांकडून स्वागत
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
सर्वसामान्य घटकातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने महानगरपालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 पासुन इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात आली आहे. शैक्षणिक 2023-24 साठी ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मागील वर्षी या महापालिकेच्या या शाळेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळला होता. या शाळेचे पनवेलकरांकडून स्वागत होत आहे.

आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर के.जी. या वर्गाचे द्वितीय वर्ष लोकनेते दि.बा पाटील विद्यालय येथे सुरू होत आहे. सदर वर्गातील विद्यार्थ्यांची क्षमता 40 असणार आहे. महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण मोफत असणार आहे. पनवेल मनपा इंग्रजी शाळेच्या 3 किमीच्या परिसरातील विद्यार्थ्यांना सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. या वर्गासाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया दिनांक 27 मार्च, सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्‍चित करण्यासाठी लवकरात लवकर प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

हे प्रवेश अर्ज मोफत असून प्रवेश अर्ज भरत असताना बालकाचे जन्म प्रमाणपत्र असणेआवश्यक आहे. तसेच रहिवासी पुरावा म्हणुन आधार कार्ड, पालकांचे पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, विजबील, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, रेशनिंग कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडे तत्वावर राहणा-या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणुन घेण्यात येईल. ज्युनियर के.जी. मध्ये प्रवेश घ्यावयाच्या बालकाचा जन्म दिनांक 01/07/2018 ते दि. 31/12/2019 या दरम्यान झालेला असावा. प्रवेश घेण्यास इच्छुक बालकाचे वय 5 वर्ष 5 महिने30 दिवस इतके असणे गरजेचे आहे.

या प्रवेश अर्जांची लॉटरी दिनांक 17 एप्रिल दुपारी 11 वाजता काढण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज लोकनेते दि.बा पाटील विद्यालय ,दांडेकर हॉस्पीटल व आगरी समाज हॉल समोर उपलब्ध असणार आहेत. तसेच अधिक माहितीसाठी श्रीम. भारती धोंगडे ( मो.नं 8097570697),श्रीम. सोनल भिसे(मो.नं 9773469803) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी(प्र) श्रीम. किर्ती महाजन यांनी केले आहे.

Exit mobile version