शेतकर्यांचा आरोप
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील शेतकर्यांना कृषी विभागाकडून खरीप हंगामात भाताचे वाण तयार करण्यासाठी बियाणे देण्यात आले होते. त्या बियांना भेसळ असल्याचा आरोप प्रगत शेतकर्यांनी केला आहे. दरम्यान, त्या बियाणांपासून शेतामध्ये भाताचे पीक जोमात आले पण त्या पिकात वेगवेगळ्या प्रकारची भेसळ असल्याचे दिसून आल्याने त्या भेसळयुक्त भाताच्या उत्पादनामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात लागवड करून भात पिकवत आहेत.त्यातच भात पिकाच्या वेगवेगळ्या जातीचे पीक घेऊन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्यांना प्रस्ताहन करून पुढाकार घेतला होता. कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी चांगल्या प्रकारची शेती करतात. यामुळे कर्जत कृषी विभागाने भाताचे वाण शेतकर्यांना देण्यात आले होते. मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात तांबूस रंगाचा भात पिकाची लागवड शेतकर्यांनी केली होती. या भाताला बाजारात चांगला भाव असून सरासरी दीडशे रुपये प्रति किलो भाव मिळत असून भातपिकाचे उत्पादन देखील चांगले झाले आहे.
परिणामी कर्जत कृषी विभागाकडून ह्या पिकाच्या लागवडीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहन करण्यात आले होते. या पिकाची लागवडीसाठी शेतकर्यांना काही अटी शर्तीवर लागवडीसाठी बियाणे मोफत देण्यात आले होते. शेतकर्यांनी या बियाणांच्या भात पिकाची मोठ्या क्षेत्रफळावर शेतात लागवड करून पीक पिकवले आहे. आता पीक कापणीवर आले असून यात मोठी प्रमाणात भेसळ पहायला मिळत आहे. त्यामुळे अधिक उत्पादन शेतात दिसत असताना भेसळ झालेल्या पिकामुळे कदाचित आर्थिक नुकसान शेतकर्यांना सहन करावे लागणार आहे.
बदलते हवामान आणि अनियमित वातावरण तर आलेले चक्रीवादळामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच आता कृषी विभागाकडून बियाणांची पाहणी न करता शेतकर्यांना बी पेरणीसाठी देण्यात येत असल्याने शेतकरी कोणाच्या भरवश्यावर आपली भात पीक पिकवणार हा देखील मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे.
शशिकांत मोहिते, प्रगत शेतकरी
त्या बियाणात भेसळीचे प्रमाण एक टक्का असू शकते, परंतु शेतजमीन मधील दोष देखील कारानुभूत असू शकतात. ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही शास्त्रज्ञ यांना घेऊन मोहिते यांच्या शेतावर जाऊन आलो आहोत.
शीतल शेवाळे, तालुका कृषी अधिकारी