कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अ‍ॅड. गायकवाड इच्छुक

| पाली | वार्ताहर |

कोकण पदवीधर निवडणूक घोषित झाल्याने विविध पक्षातील पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुकांच्या रांगेत उभे असलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी बहुजन विद्यार्थी संघटनेकडून देखील कोकण पदवीधरसाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे सुधागड तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुशील गायकवाड उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे व तसा सोशल मीडियाद्वारे प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे.

गेली अनेक वर्षे अ‍ॅड. सुशील गायकवाड हे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्‍न तडीस लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील सुधागड, पेन, खोपोली, कर्जत, नागोठणे रोहा, अलिबाग, माणगाव, महाड अशा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कनिष्ठ विद्यालय, महाविद्यालये, पॉलिटेक्निक्स इंजिनीअरिंगच्या कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्‍न समजाऊन घेत ते मार्गी लावण्याचे काम सातत्याने करीत आहेत. तसेच इयत्ता 11वीत प्रवेशासाठी डोनेशन न घेता शासन नियमाप्रमाणेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे याकरिता त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. सुधागड तालुक्यात देखील प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी व रायगड जिल्हाध्याक्ष संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली याविरोधात आमरण उपोषणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना अकरावीत मोफत प्रवेश मिळवून दिला होता.

सुधागड तालुक्यात यावेळी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुशील गायकवाड यांच्या नेतृत्वात कोकण पदवीधरसाठी शंभरहून अधिक नवमतदार नोंदणी करण्यात आली असून सबंध रायगड जिल्ह्यात बहुजन विद्यार्थी संघटनेचे हजारोच्या संखेने पदवीधर मतदार आहेत. अ‍ॅड. सुशील गायकवाड हे विद्यार्थी प्रश्‍नांबरोबरच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे रायगड जिल्हा युवा सचिव आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर बहुजन समाज आहे. रिपब्लिकन पार्टीचे युवक देखील त्यांना जोडले गेलेले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात ते चांगला मताधिक्य घेतील हे मात्र निश्‍चित आहे.

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांच्यासाठीही संघटना काम करीत असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, सुशिक्षितांचा आवाज अ‍ॅड. सुशील गायकवाड यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधी मंडळात उठविला जाईल असा विश्‍वास व्यक्त करीत कोकण पदवीधर निवडणुकीसाठी बहुजन विद्यार्थी संघटनेकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांच्याकडे व्यक्त करणार असल्याचे अ‍ॅड. गायकवाड यांनी सांगितले.

Exit mobile version