डीसीएमजवळ तक्रार केली तरी काही फरक पडत नाही; मोहितेची उद्दाम भाषा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भाजप आणि दलबदलू आमदार महेंद्र दळवी यांच्यातील संघर्ष रस्त्यावर आला आहे. पैशासाठी दळवीसोबत जाणाऱ्या भाजपचा बदनाम पदाधिकारी महेश मोहिते यांनी दळवीसोबत येत नसल्याने
भाजपा अलिबाग-मुरूड विधानसभा संयोजक पंकज अंजारा यांना जाब विचारत शिवीगाळ करून आपल्या बाऊन्सरद्वारे जबर मारहाण केली. या मारहाणीत पंकज अंजारा यांना जबर दुखापत झाली असून त्यांचा हात मोडला आहे. ही घटना अलिबागमधील रायगड बाजारसमोर रविवारी (दि.27) रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे संपूर्ण मतदारसंघात संताप व्यक्त केला जात आहे.
पंकज अंजारा आणि त्यांच्या पत्नी जान्हवी अंजारा हे दोघे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. थळ परिसरात त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले असल्याने आमदार महेंद्र दळवी यांचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वी अनेकदा धमकावून घबरवण्याचे देखील प्रकार घडले आहेत. मात्र, आमदारांच्या दहशतीला भिक न घालता अंजारा पती-पत्नी यांनी पक्ष कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांना वाढता प्रतिसाद पाहून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप पंकज अंजारा यांनी केला आहे. महेंद्र दळवी यांच्या दादागिरीमुळे त्यांच्यापासून चार हात लांबच राहण्याचा प्रयत्न ते करत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रचारात देखील ते सहभागी होत नसल्याचे दिसते. आमदारांकडून मिळत असलेल्या आर्थिक लाभापोटी महेश मोहितेसारख्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःला दळवी यांच्या दावणीला जुंपून घेतले आहे.
रविवारी रात्री रायगड बाजार परिसरात आंजारा आणि महेश मोहिते यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी महेश मोहिते यांनी सरळ सरळ धमकावत एकेरी भाषेत दळवी सोबत न येण्यावरून जाब विचारला. त्यावर अंजारा यांनी आपल्याला दळवी यांच्याकडून मिळत आलेल्या वागणूकिबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही ऐकून न घेण्याच्या मनःस्थितीत असलेल्या मोहिते यांनी शिवीगाळ करीत आपल्या बाऊन्सरकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण एवढी जबर होती की यात अंजारा यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या मारहाणीत तिथे दिवे विकणाऱ्या विक्रेत्यांचे खूप नुकसान झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना घाबरत नाही; मोहितेची मुक्ताफळे
या मारहाणीनंतर महेश मोहिते यांनी पंकज अंजारा यांना धमकावत कोणाला जावून सांगायचे त्याला सांगा. डीसीएमना जाऊन सांगितलेस तरी मला फरक पडत नाही, अशी उद्दाम भाषा वापरल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे.
थेट रस्त्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्याला गुंडगिरी करीत मारहाण करणाऱ्या मोहितेवर भाजप काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.