रस्त्यावरील चिखलामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका, हजारो लीटर पाणी वाया
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील कोलाड बाजारपेठ तसेच तळवली गावाजवळील रस्त्यावर उडत असलेल्या धुरळ्याला पर्याय म्हणून पाण्याची फवरणी केली जात आहे; परंतु या फवारणीमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे दुचाकी गाड्या स्लीप होऊन अपघात होत आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शिवाय, हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 17 वर्षांपासून सुरु आहे. गणेशोत्सवानंतर या महामार्गाचे काम वेगाने सुरु असले तरी या कामात कोणतेही नियोजन नाही. कारण, एका बाजूच्या रस्त्याचे काम सुरु करण्याच्या अगोदर दुसर्या बाजूच्या रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे केले पाहिजे होते; परंतु असे काहीच झाले नाही. याचा नाहक त्रास प्रवासीवर्गाला भोगावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सिमेंट काँक्रिट रस्ता, उड्डाणपूल, छोटे-मोठे ब्रिज, गटाराचे काम विविध ठिकाणी सुरु आहे. परंतु, असे असले तरी हे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही. कोलाड बाजारपेठेत तसेच तळवली येथील रस्त्यावर प्रचंड धुळीने जनता पूर्णपणे हैराण झाली असून, ही धूळ व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे. याला पर्याय म्हणून ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी मारले जात आहे; परंतु यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. तसेच दोन तासांनी परिस्थिती जैसे थे अशीच होते, यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात असून, शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया चालले असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरु असून, हे काम केव्हा पूर्ण होईल हे सांगता येत नाही. परंतु, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे या महामार्गावर दररोज अपघात होऊन असंख्य प्रवाशांचा नाहक बळी गेला, अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, याला जबाबदार कोण?
– चंद्रकांत लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते