ॲड. परेश जाधव यांचे मार्गदर्शन

| तळा | प्रतिनिधी |

श्री गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठान संचलित जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा यांच्या वतीने चरई बुद्रुक येथे दि. 8 ते 14 डिसेंबर या कालावधीत 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष निवासी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी (दि.9) महाविद्यालयास सुप्रसिद्ध विधीज्ञ मा. ॲड. परेश जाधव यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या विधीज्ञ सहकाऱ्यांमध्ये ॲड. सपना ढोले, ॲड. विलास सनस व ॲड. अजिंक्य नाईक यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड. परेश जाधव यांनी विकसित भारतासाठी युवकांचे सामर्थ्य आणि जबाबदारी या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.

आपल्या व्याख्यानात मा. जाधव यांनी यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक व मानसिक आरोग्य, कुटुंबीय मूल्ये, आर्थिक शिस्त, मैत्री आणि सामाजिक संबंध तसेच स्वातंत्र्य व जबाबदारी या संकल्पनांची अत्यंत प्रभावी व वेगळ्या शैलीत मांडणी केली. विविध छोट्या कथा, उदाहरणे व अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी एनएसएस स्वयंसेवकांना जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच महिलांशी संबंधित नव्या कायद्यांची सविस्तर माहिती देत कायदेविषयक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रेरणादायी व्याख्यानामुळे एनएसएस स्वयंसेवकांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली.

Exit mobile version