। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगडच्या मुख्य सरकारी अभियोक्ता पदावर अॅड. संतोष सखाराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष पवार यांनी यापूर्वी देखील मुख्य सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहिले आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर अॅड. भुषण साळवी यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. अडीच वर्षांनी त्यांच्या जागी पुन्हा अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश विधी व न्याय विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत. त्यानुसार म्हटले आहे की, जिल्हा व सत्र न्यायालय रायगड येथील जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता या पदाचा कार्यभार शासनाच्या निर्देशानुसार अॅड. संतोष सखाराम पवार यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.
अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर माजी जिल्हा सरकारी वकील तथा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रसाद पाटील यांनी तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे भाजपाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.