नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला द्यावी

कृषी अधिकार्‍यांचे शेतकर्‍यांना आवाहन

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

चालू खरीप हंगामामध्ये मुरुड तालुक्यामध्ये पीक विमा योजना चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे. भात, नाचणी व उडीद ही पिके अधिसूचित असून योजनेमध्ये चालू खरीप हंगामामध्ये मुरुड तालुक्यातील 1 हजार 177 इतक्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. सध्या भातपीक काढणीला आलेले असून गेल्या आठवड्यापासून पावसाचे वातावरण तयार होत आहे. तसेच, अधूनमधून पाऊसदेखील पडत आहे. अशावेळी काढणी झालेल्या भातपीकाचे पावसामुळे नुकसान झाल्यास ज्या शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विमा काढलेला आहे, अशा शेतकर्‍यांनी वेळीच विमा कंपनीला पूर्वसूचना दिली तरच नुकसान भरपाई मिळेल.

काढणी पश्‍चात या बाबीअंतर्गत अधिसूचित पिक (भात, नाचणी व उडीद) कापणी करून सुकवण्यासाठी ठेवलेले असताना कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांत (14दिवस) गारपीट चक्रीवादळ यामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पाऊस यापैकी जे कारण असेल ते नमूद करून काढणी पश्‍चात या बाबी अंतर्गत नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. पिक नुकसानी बाबतची पूर्वसचना केंद्र शासनाने विकसित केलेल्या किंवा विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचे जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालय, विमा कंपनीचा ई-मेल, संबंधित बँक किंवा कृषी विभाग यांना देण्यात यावी. रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी टोल फ्री क्रमांक -18002089200 या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक संपर्क करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version