कबड्डी स्पर्धेत पुरुष, महिला संघांची आगेकूच

| मुंबई | प्रतिनिधी |

बंड्या मारुती सेवा मंडळाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो. मान्यतेने आयोजित केलेल्या आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत गुड मॉर्निंग, स्वस्तिक क्रीडा, बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन व चेतक स्पोर्ट्स यांनी पुरुषांत, तर शिवशक्ती महिला, शिवशक्ती- नांदेड, महात्मा गांधी, नवशक्ती स्पोर्ट्स यांनी महिलांत उपांत्य फेरीत धडक दिली.

गुड मॉर्निंग विरुद्ध स्वस्तिक, बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन विरुद्ध चेतक स्पोर्ट्स अशा पुरुषांत, तर शिवशक्ती महिला विरुद्ध शिवशक्ती- धुळे, महात्मा गांधी विरुद्ध नवशक्ती स्पोर्ट्स आशा महिलांत उपांत्य लढती होतील. ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या गुड मॉर्निंगने अत्यंत चुरशीच्या लढतीत पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनला 30-28 असे चकवीत उपांत्य फेरी गाठली.


उपनगरच्या स्वस्तिकने मुंबईच्या विजय क्लबचा 52-17 असा धुव्वा उडवीत आरामात उपांत्य फेरी गाठली. नांदेडच्या बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने रायगडच्या मिड-लाईनचा प्रतिकार 33-26 असा मोडून काढत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. पुण्याच्या चेतक स्पोर्ट्सने रत्नागिरी-चिपळूणच्या वाघजाई मंडळाचे आव्हान 24-21 असे मोडून काढत उपांत्य फेरीत धडक दिली.

महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या शिवशक्तीने मुंबईच्या श्री स्वामी समर्थला 56-19 असे सहज नमवित आपणच या स्पर्धेच्या विजेतेपदाचे दावेदार हे दाखवून दिले. धुळ्याच्या शिवशक्तीने ठाण्याच्या राजर्षी छत्रपती शाहू संघाला 34-32 असे चकवीत आपली आगेकूच सुरू ठेवली. उपनगरच्या नवशक्तीने 5-5 चढायांच्या डावात मुंबईच्या विश्‍वशांतीचे कडवे आव्हान 36-35 (6-5) असे परतवीत उपांत्य फेरीत धडक दिली. शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधीने मुंबईच्या डॉ. शिरोडकरचा 43-22 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.

Exit mobile version