कर्जत तालुक्यात समूह शेतीतून प्रगती

11 शेतकर्‍यांच्या श्रमाला यश

| नेरळ | संतोष पेरणे |

कर्जत तालुक्यातील हुमगाव या आदर्श गावामध्ये गट निर्माण करून समूह शेती करण्यात आली आहे. राजनाला कालव्याच्या पाण्यावर त्या भागात भाताची दुबार शेती केली जाते. मात्र त्या ठिकाणी तेथील 11 शेतकर्‍यांनी यांत्रिक शेतीचा प्रयोग केला आहे. त्यांचा हा सामुहिक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. बांदावर घाम गाळणार्‍या बळीराजाच्या या सामुहिक प्रयत्नांना यश मिळत असल्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे.

हुमगांव मधील पंढरीनाथ वामन बागडे, बळीराम वामन बागडे, दिलीप भाऊ भुंडेरे, शिवाजी सिताराम बार्शी, अविनाश भाऊ भुंडेरे, प्रमोद दूंदा बार्शी रत्ना, नाथा धुंदा बागडे, लक्ष्मण जग्गू कराळे, दिनेश विठू धुळे, अरुण तुळशीराम भुंडेरे, मारुती चंदू बागडे या शेतकर्‍यांनी समूह शेती केली आहे.

ट्रे मध्ये भाताची रोपे
या समूह शेतीमध्ये भाताचे रोप हे देखील ट्रे मध्ये लावण्यात आली. त्यासाठी प्लास्टिक मल्चिंग चा वापर करण्यात आला होता. ही रोपे लागवड योग्य झाल्यानंतर 21 ते 25 दिवसांमध्ये भात लावणी यंत्रामधून टाकून शेतात त्या रोपांचा लागवड करण्यात आली. त्याचवेळी खतांची मात्रा देखील फवारणी यंत्रामधून दिली जात असून सर्व शेती हि यांत्रिकी पद्धतीने केली गेली आहे. भाताचे पीक तयार झाल्यावर भाताची कापणी केली जाणार आहे.

शेतकर्‍यांची चिकाटी आणि मेहनत लक्षात घेऊन कर्जत कृषी विभागाने त्यांच्याकडे समूह आणि यांत्रिक शेती करण्याचा प्रयोग साकारण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, तालुका मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, गायकवाड यांनी समूह शेतीसाठी तयार केले आणि त्या भागात समूह शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले आहेत.

समूह शेती आणि यांत्रिकी शेतीच्या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी भेटी देत आहेत. त्यात उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली बालाजी ताटे यांनी लागवड केलेल्या क्षेत्राची पाहणी केली. यावेळी म अशोक गायकवाड, दिनेश कोळी तसेच सचिन केणे, रुपाली सोनोने आदी अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version