कळंबोली सर्कलवर अवाढव्य फलकाची उभारणी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
सिडको प्रशासनाचा ना हरकत दाखला न घेताच पालिका प्रशासनाने जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमलेली एजन्सी सिडकोच्या जागेत फलक उभारत असल्यावरून सिडकोने नुकतेच नोटीस बाजावून पालिकेच्या परवाना विभागाचे कान टोचले आहेत. सिडकोने पाठवलेल्या नोटीसीनंतर संबंधित विभागाची परवानगी घेऊनच जाहिरात फलक उभारण्यात यावेत, अशी ताकीद पालिका प्रशासनाकडून संबंधित जाहिरात एजन्सीला देण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा एमजीएम रुग्णालयाच्या शेजारी कळंबोली-जेएनपीटी मार्गावर असलेल्या सिडकोच्या भूखंडावर जाहिरातदार कंपनीकडून फलक उभारण्याचे काम सुरु करण्यात आल्याने पालिकेने नेमलेली एजन्सी पालिका प्रशासनाला जुमानतच नसल्याचे सिद्ध होत आहे.
पनवेल पालिकेच्या जाहिरात धोरणा नुसार पालिका हद्दीत विविध ठिकाणी जाहिरात फलक उभारून जाहिरातबाजी करण्यासाठी एका खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. या एजन्सीसोबत पालिकेने केलेल्या करारनुसार पालिकेच्या तिजोरीत जवळपास चार कोटी रुपयांची भर पडणार आहे. एजन्सीची नेमणूक करताना पालिकेने आखून दिलेल्या नियम आणि निकषानुसारच पालिकेने सर्वे करून ठरवून दिलेल्या जागेवरच जाहिरात फलक उभारण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर जाहिरात फलक उभारण्यापूर्वी आखून दिलेली जागा पालिका प्रशासनाव्यतिरिक्त इतर प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्यास त्या प्राधिकरनाचा ना हरकत दाखलादेखील एजन्सीने घेणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही पालिकेने नेमलेली कंपनी सिडको अथवा इतर कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेताच पालिका हद्दीत फलक उभारत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पालिकेच्या परवानगीने जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमण्यात आलेली एजन्सी ज्या भूखंडावर फलक उभारत आहे तो भूखंड सिडकोने एमजीएम रुग्णालयाला सुशोभिकरण करण्यासाठी करारावर दिला आहे. सिडको विभागाने रुग्णालय प्रशासनाशी करार केलेला असताना पालिकेचे परवाना विभाग त्या ठिकाणी फलक उभारण्यास परवानगी कशी देऊ शकते, असा सवाल उपस्थित होत आहे.
पालिका प्रशासन हतबल
सिडकोने पाठवलेल्या नोटीसीनंतरही जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमण्यात आलेली कंपनी सिडको विभागाची परवानगी न घेताच फलक उभारत असल्याने याबाबत पालिकेच्या परवाना विभागाच्या अधिकार्यांनकडे विचारणा केली असता, सिडको विभागाकडून ना हरकत दाखला घेतला गेलेला नसल्यास सिडकोने त्या ठिकाणी कारवाई करावी, असे वक्तव्य परवाना विभागाचे अधिकारी जयराम पादीर यांनी केले आहे.
पालिकेच्या धोरणाचा पालिकेला विसर
पालिका अधिनियमानुसार महामार्गाच्या किती अंतरावर जाहिरात फलक उभारण्यास परवानगी द्यावी, या बाबत काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमानुसार महामर्गापासून काही मीटर अंतरावरच फलक उभारणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेने नेमलेली एजन्सी या नियमांच उल्लंघन करत असल्याचे अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले असता पालिकेने सर्वे करून दिलेल्या जागेवरच फलक उभारले जात असल्याचे आश्चर्यकारक उत्तर पालिका अधिकारी देत असून, एका प्रकारे पालिकेच्या धोरणांचेच उल्लंघन पालिका अधिकारी करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
रात्रीच्या अंधारात काम
पालिकेच्या परवाना विभागाने जाहिरात फलक उभारण्यासाठी एंजन्सीची नेमणूक करताना कायदेशीररित्या करार केला आहे. असे असताना संबंधित एजन्सी फलक उभारण्याचे काम मध्यरात्रीच्या अंधारातच करत असल्याने एजन्सीच्या कारभाराबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.