कळंबोली, कामोठे परिसरात झाडांची तोड
। पनवेल । वार्ताहर ।
एकीकडे झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा संदेश दिला जात असताना. दुसरीकडे कळंबोली कामोठे परिसरात महामार्गालगत झाडांची अक्षरशः कत्तल केली जात आहे. आजूबाजूच्या जाहिरात होर्डिंग्सला अडथळा निर्माण होत असल्याने अशाप्रकारे रात्रीतच झाडे तोडली जात आहेत. इतकंच नाही तर विषप्रयोग सुद्धा केला जात आहे. कामोठे सीएनजी पंपा लगत असलेल्या वडाचे महाकाय झाड छाटून बोडके करण्यात आले आहे. याबाबत प्रशांत रणवरे यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीने झाडांची तोड होईल त्याच्या समोरील किंवा मागील जाहिरात होर्डिंगची परवानगी रद्द करावी अशी मागणी नगरसेवक सतिश पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मनपाकडे केली आहे. पनवेल सायन महामार्गालगत अनेक जाहिरात होर्डींग्सना पनवेल महापालिकेने परवानगी दिली आहे. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच चालली आहे. यातून मनपाला महसूलही मिळत असेल याबाबत कोणतेही दुमत किंवा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र या परवानग्या देत असताना सर्व बाबींची तपासणी केली जात नाही. परवानगी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे यामध्ये सातत्याने हितसंबंध गुंतलेले असल्याचे एक प्रकारे दिसून येते. हे जे जाहिरातीचे फलक आहेत. त्यांच्या आड येणार्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय हानिकारक असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सतिश पाटील यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी सुरुवातीपासून आवाज उठवणारे राष्ट्रवादी युवकचे प्रशांत रणवरे यांनी सुद्धा याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेने भिंतीवर झाडांचे चित्र काढणे थांबवावे. त्याऐवजी जिवंत वृक्ष आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शब्दांमध्ये त्यांनी मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.