अलिबागमध्ये 27 मे रोजी जाहिरातीचा सेमिनार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग येथील ब्रायडिआ आणि आदर्श पतसंस्था यांच्या सहकार्याने मुंबईतील ‌‘पार्किंग’ या जाहिरात संस्थेतर्फे 27 मे रोजी आदर्श भवन, अलिबाग येथे ‌‘जाहिरात सेमिनार’ आयोजित करण्यात आला आहे. भारतात ग्रामीण भागात सर्वप्रथम जाहिरातीचा सेमिनार आयोजित करण्याचा मान अलिबागला मिळाला आहे. जागतिक पातळीवर 150 हून अधिक पारितोषिके मिळवणारे उदय पारकर हे या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

या सेमिनारचा उद्देश नफा नसून, विद्यार्थी, पालक तथा व्यावसायिकांना एक सुवर्णसंधी आहे. कारण, जागतिक कीर्तीचे जाहिरात बनवणारे तज्ज्ञ या सेमिनारमध्ये सहभागी होणार आहेत. अलिबागला या सेमिनारमुळे शिक्षण आणि व्यावसायिकता या दोन्ही दृष्टीकोनातून खूप मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक, ग्राफिक डिझाइनर या सेमिनारध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. तीन ते चार तासांचा हा सेमीनार असेल, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.

या सेमिनारमध्ये कंपनीला लोगो कसा असावा, मार्केटिंग म्हणजे काय, मार्केटिंग कारायची कशी? याचे ज्ञान उदय पारकर देतील. ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगचे व्यवसायात किती आणि कसे महत्त्व आहे याचे ज्ञान देतील. तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेस आणि वैयक्तिक मर्यादेबाहेर पडून तुमची विचारसरणी लोकांपर्यंत नेणे आणि स्वत:साठी ग्राहकवर्ग तयार करणे आवश्यक आहे. जाहिरात आणि विक्री हा मार्केटिंगचा एक भाग आहे, पण मार्केटिंग हे फक्त एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्याच्याशी संबंधित बऱ्याच गोष्टींची माहिती या सेमिनारद्वारा देण्यात येईल.

सेमिनार हॉलमध्ये उदय पारकर यांनी केलेली जगभरातून पारितोषिके मिळालेली ब्रँड लोगो आणि मार्केटिंगची कामे जवळून पाहायला मिळतील. तसेच उदय पारकर यांच्यासोबत ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगसंबंधित प्रश्नोत्तरे आणि चर्चा करता येईल. कारण जाहिरात कशी केली जाते, हे जवळून पाहणे ही पर्वणी असते. या सेमिनारचे रेजिस्ट्रेशन ऑनलाईन घेण्यात आले आणि देशभरातून मोठमोठ्या संस्थांमधून 100 डिझायनर्स, विद्यार्थी आणि व्यावसायिक या सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी 27 मे रोजी अलिबागला भेट देणार आहेत. हा कार्यक्रम 15 दिवस आधीच हाऊसफुल्ल झाला आहे. या सेमिनारनंतर लवकरच देशभरातील डिझायनर्ससाठी निवासी वर्कशॉपचे अलिबागमध्ये आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली.

Exit mobile version