बहूमतांनी शेकापचा विजय; विरोधकांना केवळ तीन मतांमध्ये समाधान
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीनंतर उपनगराध्यक्षपदाची निवड सोमवारी (दि.12) झाली. या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाच्या ॲड. मानसी म्हात्रे यांना बहुमत मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी जाहीर केले. हात उंच करून मतांची प्रक्रीया राबविण्यात आली. यामध्ये ॲड. मानसी म्हात्रे यांना 17 तर विरोधकांना त्यांच्यासहित केवळ तीनच मते मिळाली. यावेळी म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार अक्षया नाईक या बहुमतांनी निवडून आल्या. तसेच नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. पुन्हा एकदा अलिबाग नगरपरिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला. नुकतीच नगराध्यक्षपदाची धुरा अक्षया नाईक यांनी हाती घेतली. सोमवारी (दि.12) उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रीया अलिबाग नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. शेकापच्या ॲड. मानसी म्हात्रे तर भाजपचे ॲड. अंकीत बंगेरा यांनी उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. एक जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक घेण्यात आली. हात उंच करून मतांची प्रक्रीया मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी राबविली. यामध्ये ॲड. मानसी म्हात्रे यांना 17 मते मिळाली. भाजपचे बंगेरा यांना केवल तीनच मतांनी समाधान मानावे लागले. त्यामुळे अंकीत बंगेरा यांचा या निवडणूकीत दारूण पराभव झाला असून ॲड. मानसी म्हात्रे प्रचंड मतांनी विजयी झाल्या. मानसी म्हात्रे यांची उपनगराध्यक्ष म्हणून बहुमतांनी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी अलिबागच्या नगराध्यक्ष अक्षया नाईक, गट नेते तथा नगरसेवक प्रशांत नाईक, ॲड. निलम हजारे, अनिल चोपडा, संध्या पालवणकर, सुषमा पाटील, डॉ. साक्षी पाटील, आनंद पाटील, निवेदिता वाघमारे, समीर ठाकूर, ऋषीकेश माळी, ॲड. अश्वीनी ठोसर, योजना पाटील, सागर भगत, शैला भगत, वृषाली भगत, संतोष गुरव, प्रदिप नाईक, आदी उपस्थित होते. नगरसेवक म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या ॲड. मानसी म्हात्रे यांनी यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून भुमिका सांभाळली आहे. सलग दुसऱ्यांदा उपनगराध्यक्ष म्हणून त्या निवडून आल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात आले. शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी ॲड. मानसी म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन शेतकरी भवनमध्ये अभिनंदन केले.
शुभेच्छांचा वर्षाव
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांची अलिबागच्या उपनगराध्यक्षपदी बहुमतांनी निवड झाली. या निवडीनंतर ॲड. मानसी म्हात्रे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप शेतकरी सभा अध्यक्ष अनिल पाटील, सुशील पाटील, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

सर्वांना सोबत घेऊन काम करणार - ॲड. मानसी म्हात्रे
शेकाप नेते जयंत पाटील तसेच शहराने माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. या पदाचा मान राखण्याचा काम कायम करेन. आज माता जिजाऊंचा जन्म दिवस आहे. या दिनानिमित्त संपुर्ण अलिबागकरांना आश्वासीत करते की, नगराध्यक्षा अक्षया नाईक व संपूर्ण टीम असे सर्वांना सोबत घेऊन प्रथम महिला सबलीकरणावर भर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. नागरी सुविधा देण्याबरोबर शहरातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न कालखंडात जरूर केले जाईल. शहरातील विकास अधिक मजबूत व्हावा. शहरातील कामे चांगली झाली पाहिजेत, ही भावना ठेवून एकमेकांच्या सोबतीने काम केले जाईल अशी ग्वाही उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिली.
नगरसेवकपदी प्रदिप नाईक, जमाल सय्यद
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीनंतर अक्षया नाईक यांनी नगराध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली. त्यानंतर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत शेकापच्या ॲड. मानसी म्हात्रे बहूमतांनी विजयी झाल्या. सोमवारी झालेल्या निवडीनंतर स्विकृत नगरसेवक म्हणून शेकापच्या दोन जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रदिप कृष्णाजी नाईक व जमाल युसूफ सय्यद यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष अक्षया नाईक, गटनेते तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यापुर्वी देखील प्रदिप नाईक अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक होते.











