। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत येथील दिवाणी न्यायालयात प्रॅक्टिस करणार्या वकिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा रचला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा चित्रफीत प्रकाशन सोहळा कर्जत दिवाणी न्यायालयात पार पडला.
कर्जत येथील न्यायालयात वकिली करीत असलेले वकील शेलू येथील अॅड.संदीप बागडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आज नव्याने जागु दे महाराष्ट्राचा अभिमान हे गीत रचले आहे. त्या गीताला याच न्यायालयात वकिली करणारे तालुक्यातील पोही येथील वकील अजय भोईर यांनी स्वरबद्ध करून गायले आहे. या चित्रफितीचे प्रकाशन कर्जत दिवाणी न्यायालयात करण्यात आले. त्यावेळी या न्यायालयाचे न्यायाधीश मनोद तोकले यांनी चित्रफितीचे प्रकाशन केले आणि शुभेच्छा दिल्या. न्यायालयात हा पोवाडा वकील अजय भोईर यांनी गाऊन दाखवत सर्व सहकारी वकिलांची वाहवा मिळविली. त्यावेळी ज्येष्ठ वकील राजेंद्र निगुडकर, तसेच अन्य वकील उपस्थित होते.







