| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई, नवी मुंबई व रायगडमधील 13 जखमी कासवांपैकी 12 कासवांना ऐरोली येथील कांदळवन खात्याअंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक वैद्यकीय उपचार केंद्रात जीवदान मिळाले आहे. तर एका कासवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई परिसरातील समुद्र जीवांसाठी ऐरोलीचे हे उपचार केंद्र संजीवनी ठरत आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि अलिबाग येथील सागरी किनारपट्ट्यांवर पावसाळ्यात मच्छीमार बोटी, मासेमारी जाळ्यात अडकून जखमी होणार्या प्राण्यांसाठी वनविभागाकडून नवी मुंबईतील ऐरोली येथे उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. या उपचार केंद्रात 11 ऑगस्ट 2019 ते आत्तापर्यंत जवळपास 13 कासवांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यात 2020 मध्ये अनुक्रमे बोरिवली, जुहू समुद्र किनार्यावरील जखमी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचा समावेश होता. 2021 मध्ये जुहू येथील तीन, तर अलिबाग येथील ऑलिव्ह रिडले कासव आणि एका हॉक्सबिल कासवाचा समावेश होता.
दुर्मिळ प्रजाती वाचवण्याची धडपड
कासवांच्या प्रजातींपैकी एक असलेल्या लॉगरहेड सी टर्टल हे दुर्मिळ प्रजातीचे कासव 17 ऑगस्टला मड आयलॅण्ड येथे जखमी अवस्थेत आढळून आले होते. या कासवाच्या कवचाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. 1 मीटर बाय 0.90 मीटर आकारमानाचे या कासवाचे वजन साधारणतः 130 किलो होते. ऐरोली येथील उपचार केंद्रात दाखल झालेल्या या कासवाला तब्बल दोन महिने उपचारानंतर वाचवण्यात यश आले.
जखमी कासवाला प्रतिदिन 2 किलो खेकडे आणि कोळंबी देण्यात येते. तसेच डॉक्टरांनी फिटनेस प्रमाणपत्र दिल्यावर त्याला पुन्हा त्याच्या अधिवासात सुखरूप सोडण्यात येते.
विश्वास सुर्वे
वनरक्षक
समुद्री प्राण्यांना तत्काळ उपचार मिळत असल्याने ऐरोलीचे हे केंद्र उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून दुर्मिळ प्रजाती वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रशांत बहादुरे
वनक्षेत्रपाल, कांदळवन विभाग