| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ताडवागळे हा परिसर दुर्गम आहे. या परिसरात आदिवासी समाज भरपूर प्रमाणात वास्तव्यास आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असले तरी शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. या विभागाला लाभलेले तरुण नेतृत्व शैलेश पाटील सर्वसामान्यांच्या हाकेला धावत आहे. याचा पक्षाला सार्थ अभिमान आहे. या परिसरातील जनतेला मूलभूत गरजा पुरविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जनतेच्या सर्वांगिण विकासाच्या माध्यमातून आपण घराघरात पोहोचलो आहोत. यामुळेच जनतेच्या मनात शेतकरी कामगार पक्षाबद्दल आत्मीयता आणि आपुलकी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.
ताडवागळे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.29) नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. पंडीत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ग्रामपंचायत सदस्य नारायण पारधी, अर्चना हंबीर, मीनाक्षी पाटील, वनिता पाटील, सविता लोभी आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता वाघेश्वरवाडी तळाशेत अंतर्गत रस्ता आणि वाघजाई येथील व्यायामशाळेचे उद्घाटन शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आणि चित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वाघजाई व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले की, शेकापने ताडवागळे परिसरातील सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन विकासाची गंगा आणली आहे. प्रत्येक गावात आणि वाड्यांवर रस्ता, वीज आणि पाणी पोहचविण्याचे यशस्वी नियोजन केले आहे. लाल बावट्याबरोबर ताडवागळे परिसरातील जनतेची नाळ जुळली असल्याने येथील जनता नेहमीच शेकापच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. आगामी काळात या परिसराचा विकास होणार आहे. जनतेला अपेक्षित असणारा विकास करण्यासाठी शेकाप सज्ज झाला आहे.
डाव्या विचारांमध्ये विकासाचा झंझावात असतो, हे शेतकरी कामगार पक्षाने अनेकदा सिद्ध केले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शैलेश पाटील यांच्यासारखे युवा नेतृत्व पुढाकार घेत आहेत. यामुळेच रायगड जिल्ह्यात शेकापचा लालबावटा दिमाखाने फडकत आहे. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात शेकापच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरुणांची फौज लालबावट्याच्या सानिध्यात आल्याने शेकापची कार्यप्रणाली तळागाळात खोलवर रुजली जात आहे.
चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख, शेकाप