। रोहा । वार्ताहर ।
रोहा शहरानजिक असलेल्या तळाघर ग्रामपंचायत हद्दीतील वैशाली नगर येथे असलेल्या बौद्ध समाजाच्या लोकांची पाण्याअभावी परवड होत असून रात्र रात्र चार हंडे पाणी मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील १५ वर्षांपासून पाण्याचा तुटवडा असून पालकमंत्री, आमदार,खासदार,सरपंच, ग्रामसेवक सर्वांकडे कैफियत मांडून देखील पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने मंगळवारी सकाळी १०.३० वाजता रोहा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती स्थानिक युवकांनी दिली आहे.
धाटाव औद्योगिक वसाहतीलगत असणाऱ्या तळाघर ग्रामपंचायतीमध्ये वैशाली नगर नावाची आठ दहा घरांची दलित समाजाची वस्ती आहे.गावात असलेल्या सार्वत्रिक नळ कोंडाळ्यावर त्यांना पाणी भरता येते.पण चार हंडे पाणी मिळविण्यासाठी त्यांना रात्री अपरात्री हंडे घेऊन जावे लागते.या वाडीसाठी स्वतंत्र पाणी योजना नाही की सुस्थितीतील विंधन विहीर नाही.दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्री पाण्यासाठी जागरण करायचे हा येथील लोकांचा दिनक्रम झाला आहे.तालुक्यातील सर्व मोठ्या नेते मंडळींना निवेदने दिली.घरी जाऊन विनवण्या केल्या.पण त्यांना होणाऱ्या या त्रासाची दखल घेण्यास या पुढाऱ्यांना वेळच नाही असेच दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी येथील युवकांनी शेकाप नेते माजी आमदार पंडीत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले होते.या प्रकरणात प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास पाण्यासाठी संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.