मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची परवड

मंजुरी मिळालेल्या रस्त्याला मुहूर्त मिळेना
प्रशासन, कंत्राटदाराचा नियोजनशून्य कारभार
नागरिकांमध्ये संतापाची लाट

| वावोशी | वार्ताहर |

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना आजही ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सोयी सुविधांसाठी ग्रामीण भागातील जनतेला झगडावे लागत आहे. खालापूर तालुक्यातील वावोशीमधील नागरिकांच्या नशिबीदेखील याच यातना आहेत. वावोशी फाटा ते परखंदे धनगरवाडी असा तीन किलोमीटर अंतराचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमधून रस्ता मंजूर होऊन तीन वर्षे व्हायला आली तरीदेखील अद्याप या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. आतापर्यंत केलेल्या रस्त्यामध्येदेखील मोठमोठे खड्डे पडले असून, नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे असह्य झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, नागरिकांमधूनही प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

वावोशी फाटा ते परखंदे धनगरवाडी असा तीन किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून घेतलेले हे काम 1 फेब्रुवारी 2019 ला सुरू झाले असून, त्याची अंदाजे रक्कम पावणे दोन कोटी इतकी आहे. या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचे काम पाच वर्षे आहे. परंतु, प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे या रस्त्याच्या कामाची देखभाल तर दूरच; पण हे कामही अद्याप अपूर्ण आहे.ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्था या रस्त्याची बनली आहे. शासनाने या रस्त्यासाठी तब्बल पावणे दोन कोटी इतका निधी मंजूर केला असूनही या रस्त्याचे काम अपूर्ण का, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहात नाही.

या रस्त्याचे व पुलाचे काम अर्धवट असल्याकारणाने येथील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, पोल्ट्री व्यावसायिक, प्रवासी वाहने यांची गैरसोय झाली असल्याने प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन हे काम पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त झालेल्या नागरिकांकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.

पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून, तशा सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत

. – अनंत गोरे, उपअभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना



Exit mobile version