जि.प. बांधकाम विभागाचे आदेश; आदिवासी बांधवांना दिलासा
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव येथे जाण्यासाठी असलेला रस्ता स्थानिक व्यक्तींकडून उखडून टाकण्यात आला आहे. रस्ताच गायब झाल्याने स्थानिक नऊ आदिवासी वाड्यांमधील आदिवासींचा रस्ता बंद झाला आहे. दरम्यान, स्थानिक आदिवासी आपल्या जुन्या रस्त्यासाठी आग्रही असून, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सदर रस्ता तसाच बनविण्याचे लेखी आदेश रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करणार्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकार्यांना दिले आहेत.
रायगड जिल्हा हद्द ते बेडीसगाव आणि पुढे वाघिणीची वाडी पायथा असा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविला जाणार आहे. तीन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून 73 लाखांचा निधी मंजूर आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीला संबंधित खात्याकडून फेब्रुवारी 2021 मध्ये कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर वर्ष लोटले असून, रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. मात्र, 6 मार्च रोजी जिल्हा ग्रामीण मार्ग एक वरील रस्ता जेसीबी मशीन लावून गायब केला. संपूर्ण डांबरी रस्ता गायब केल्याने स्थानिक आदिवासी लोकांची रस्त्याअभावी पायपीट सुरू झाली.त्यात स्थानिक आदिवासी लोकांच्या शेतीचे देखील वांगणी गावातील खासगी व्यक्तींकडून नुकसान केल्याने तसेच त्या व्यक्ती कडून आदिवासी लोकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने आदिवासी समाज देखील आक्रमक झाला आहे.
कर्जत तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार एस.आर. बाचकर यांच्यासह बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद गोपणे यांनी बेडीसगाव येथे जाऊन रस्त्याची पाहणी केली आणि ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. त्यावेळी स्थानिकांचे म्हणणे ऐकून आणि पूर्वापार असलेला रस्ता तसेच यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याचे केलेले डांबरीकरण हे मुद्दे प्रशासनाने मान्य केले. या रस्त्याचे मंजूर कामाचे कार्यादेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाने मार्च 2021 रोजी दिले असून, पुढील सहा महिन्यांनंतर कामाची मुदत संपणार आहे. त्यामुळे तात्काळ रस्त्याचे काम सुरू करून आदिवासी ग्रामस्थांची गैरसोय टाळावी, अशी मागणी स्थानिक बेडीसगाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार महसूल विभागाने लेखी आदेशात केली आहे.