विद्यार्थी, पालकांचा मोर्चा
| नेरळ/वेनगाव | प्रतिनिधी |
दिल्लीतील जंतरमंतरवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी कर्जतमध्ये विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोर्चा काढत निदर्शने केली. विशेषतः नीट परीक्षेला बसलेले अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.
कर्जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालय असलेल्या प्रशासकीय भवनाकडे रवाना झाला. मात्र, पोलिसांनी प्रशासकीय भवनाबाहेरच मोर्चा अडविला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींकडे पाठविले. यावेळी नीट पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
आंदोलनात समन्वयक ॲड. कैलास मोरे, ॲड. राजेंद्र निगुडकर, सचिन भालेराव, माजी उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड, राजाभाऊ कोठारी, ॲड. क्रांती अभंगे, ॲड. सोनाली लाड, रमेश कदम, संतोष पेरणे, जितेंद्र जाधव यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, माजी सरपंच आरती भोईर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र मोरे आणि सचिन गायकवाड यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांचे उपोषण जबरदस्तीने सोडविल्याच्या घटनेचाही निषेध करण्यात आला.
दिल्लीतील आंदोलनाकडे आमचे बारकाईने लक्ष आहे. कर्जत तालुक्यातील नीट परीक्षार्थी विद्यार्थी आणि पालकांना एकत्र करून लवकरच साखळी उपोषण सुरू करण्याचा विचार आहे. दिल्लीतील आंदोलनाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील.
ॲड. कैलास मोरे







