पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देश
| नेरळ | संतोष पेरणे |
ब्रिटीशकालीन वारसा लाभलेली आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र असलेली नेरळ-माथेरान हेरिटेज मिनीट्रेन आता नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने राबविलेल्या “हायड्रोजन फॉर हेरिटेज” या महत्त्वाकांक्षी योजनेत माथेरान हिल रेल्वेचा विचार आहे. त्यामुळे रेल्वेकडून हायड्रोजन रेल्वे हा प्रयोग राबविल्यावर मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र, ब्रिटिश काळात नेरळ-माथेरान मिनीट्रेन वाफेच्या इंजिनवरच चालायची. त्यामुळे मिनी ट्रेन चालविण्यात यशस्वी ठरलेला जुनाच फंडा हायड्रोजन रेल्वे म्हणून बाजारात आणला आहे.
सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणे घेत धावणारी नेरळ-माथेरान ही मिनिट्रेन देशातील ऐतिहासिक हेरिटेज रेल्वेमागींपैकी एक मानली जाते. दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक या रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेत असतात. आता आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने या रेल्वेचे आकर्षण आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय रेल्वेने 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात “हायड्रोजन फॉर हेरिटेज” योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत ऐतिहासिक रेल्वेमार्गावर हायड्रोजर्नवर चालणारी इंजिने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच योजनेत माथेरान हिल रेल्वेचा समावेश करण्यात आल्याने या प्रकल्पाला विशेष महत्व प्रापत झाले आहे. मात्र, ब्रिटीश काळात 1853 मध्ये भारतात रेल्वे सुरू झाली त्यावेळी रेल्वे वाफेवर चालणाऱ्या इंजिनवरच चालवली जात होती. 1907 मध्ये मध्य रेल्वेवरील नेरळ येथून माथेरानसाठी मिनीट्रेन सुरू झाली. 1984 पर्यंत ही मिनीट्रेन वाफेपासून तयार होणाऱ्या ऊर्जेवर चालायची. त्यानंतर रेल्वेने जर्मन बनावटीची वाफेवरील इंजिने एक-एक करून हेरिटेज म्हणून आपल्या म्युझियममध्ये ठेवून घेतली. त्यातील एक इंजिन नवी दिल्ली येथील रेल भवन बाहेर, दुसरे इंजिन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, तिसरे इंजिन नेरळ जंक्शन येथे आणि चौथे इंजिन माथेरान रेल्वे स्थानकात शोभेचे बाहुले बनून उभी आहेत.
नुकतेच प्रधानमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केलेल्या हायड्रोजन रेल्वेच्या इंजिनमध्ये निर्माण होणारी ऊर्जा देखील कोळशापासूनच तयार होणार आहे. तसेच, गाडी पुढे जात असताना इंजिनमधून पाणी बाहेर पडणार आहे. ब्रिटिश काळात देखील वाफेवरील इंजिन अशाच प्रकारे कोळशावर चालवली जात होती. त्यामुळे हायड्रोजन इंजिनमध्ये नेमके वेगळे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. दरम्यान, देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या शुभारंभानंतर हेरिटेज रेल्वेमार्गावरही हे तंत्रज्ञान वापरण्याच्या हालचाली यांना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर माथेरान मिनिट्रेन देखील हायड्रोजन इंजिनाची जोड मिळणार असल्याने प्रवासी वर्गात आनंद आहे.
ध्वनीप्रदूषणात मोठी घट
सध्या नेरळ ते माथेरान दरम्यानच्या मिनिट्रेन इंजिनसाठी डिझेल या इंधनाचा वापर होतो. भविष्यात हायड्रोजन इंजिनाचा वापर सुरू झाल्यास धूर, कार्बन उत्सर्जन आणि ध्वनीप्रदूषणात मोठी घट होईल. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच पर्यटकांना अधिक स्वच्छ, शांत आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.







