। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि. 18) रात्री नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान मोटारसायकलचा भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे.
मुंबई- गोवा महामार्गावर राजेवाडी हद्दीतील ब्रिजवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होती की मोटार सायकलवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ‘संकेत मित्र मंडळा’चे कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी जखमींना तात्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी चेतन शिवाजी शिंदे मूळ राहणार छत्री निजामपूर, सध्या रा. बिरवाडी याला मृत घोषित केले. या अपघातातील दुसरा जखमी तरुण निलेश विष्णू लाड राहणार हावरे, ता. पोलादपूर याची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला पुढील उपचारांसाठी माणगाव येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे पुढील तपास करीत आहेत.







