| पाली/बेणसे | प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगड विभागासाठी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तरुण नेतृत्वाला संधी देत फैजल पोपेरे यांची उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे श्रीवर्धन, म्हसळा, तळा या दक्षिण रायगडातील तालुक्यांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मला दिलेल्या संधी व जबाबदारीला परिपूर्ण न्याय देणार असल्याची भावना फैजल पोपेरे यांनी व्यक्त केली आहे. मनसेकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार फैजल पोपरे यांच्याकडे दक्षिण रायगड क्षेत्रातील संघटन विस्तार, पक्षाच्या धोरणांचा प्रसार तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून विविध लोकहिताच्या व विधायक समाजाभीमुख उपक्रमांमधून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.







