| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरातील डॉ. घनश्याम शेठ यांच्या दोन्ही मुली श्रुतिका आणि नमिता यांचे लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण झाले असून, त्यांनी तेथे नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. नमिता शेठ हिने प्राथमिक शिक्षण जनसेवा प्रतिष्ठानच्या प्रशालेसह कन्या शाळा पोलादपूर येथे, तर रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिरामध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथील गरवारे विद्यापीठांतर्गत सर परशुराम भाऊ महाविद्यालयात केल्यानंतर मराठवाडा विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयासह इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजमध्ये कायदे विषयक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याचदरम्यान, नमिता हिची लहान बहीण श्रुतिका ही देखील जनसेवा आणि कन्या शाळा पोलादपूर येथे प्राथमिक शिक्षण व रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिरामध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथील गरवारे विद्यापीठांतर्गत सर परशुराम भाऊ महाविद्यालयात दाखल झाली. इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजमध्ये कायदे विषयक पदवीसोबतच श्रुतिकाने कंपनी सेक्रेटरीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर या दोघींनी उच्च शिक्षणासाठी लंडन येथे जाण्याचा निर्णय घेतला आणि तेथील ब्रुनेल कॉलेज ऑक्स ब्रीचमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये श्रुतिका शेठ हिने एमएससी इन फायनान्स एंड अकाउंटन्सी मध्ये गोल्ड मेडल प्राप्त करीत प्रथम श्रेणीमध्ये कंपनी सेक्रेटरीची पदवी प्राप्त केली. तर, नमिता शेठ हिने इंटरनॅशनल फायनान्शियल रेग्युलेशन्स अँड कॉर्पोरेशन लॉ विषयातील एलएलएम हे कायद्याचे उच्च शिक्षण प्राप्त केले.







