चार दिवसांपासून नळांना पाणीच नाही; महिलांची पाण्यासाठी वणवण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, नागरिकांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. मागील चार दिवसांपासून येथील नळांना पाणीच न आल्याने पिण्याच्या पाण्यावाचून येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. एक एक हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता श्री. वेंगुर्लेकर, पाणीपुरवठा अधिकारी श्री. कुदळे यांना निवेदन दिले असून, पाणीप्रश्न सोडवावा, अशी विनंती केली आहे. या निवेदनात त्यांनी, मोठे शहापूर, ता. अलिबाग, जि. रायगड ग्रामस्थांना आमच्या हक्काचे पिण्याचे शुद्ध आणि जागतिक आरोग्य परिषदेने किमान हक्काचे दिलेले पाणी आम्हास गेली चार वर्षे मिळत नाही. तसेच गेले आठ दिवस पाणी मिळालेले नाही. मानवी हक्क आयोगाकडे जाण्यासाठी, आम्हास जगण्यासाठी पाणी येतच नाही, त्यासाठीचा आवश्यक पंचनामा आम्ही करीत आहोत. आम्ही प्रत्यक्ष ज्या ठिकाणी खासगी व सार्वजनिक नळाच्या बाजूस 11 ते 1 या वेळेत उपस्थित राहिलो. मात्र, पिण्याचे पाणी आलेच नाही. आमच्या समक्ष ढोलपाडा येथे येणारे पाणी आणि शहापूर येथे पाईपलाईनमधून येणारे पिण्याचे पाणी याचा पंचनामा आठ दिवसात करावा, अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून एका एका हंड्यासाठी रात्र-रात्र जागून राहावे लागत असल्याचे यावेळी मोठे शहापूर येथील ग्रामस्थ हितेश पाटील यांनी सांगितले. यामुळे ग्रामस्थांसह महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहेत, परंतु, याकडे संबंधित पाणीपुरवठा विभागाने लक्ष दिलेले नाही. खरं तर, दोन ते अडीच फूट उंचीचे नळ उभारुन त्याखाली पाणी भरण्यासाठी हंडा राहणे अशी व्यवस्था असते. परंतु, आमच्या येथे संपूर्ण कारभार उलटा असून, दोन ते अडीच फूट खोल खड्डे खणून आत उतरुन महिलांना पाणी भरावे लागते, हे दुर्दैव असल्याचे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
आधीच अस्मानी संकटामुळे खार्या पाण्यात आमची शेती उद्ध्वस्त होत आहे. हे मोठे संकट असताना आता पाणीसंकट आ वासून उभे ठाकले आहे. नळा पाणी येते की नाही याचाच पंचनामा आम्ही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष नळासमोर उभे राहून केला आहे. परंतु, चार दिवसांपासून पिण्याचे पाणी आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
हितेश पाटील, ग्रामस्थ, मोठे शहापूर