अफगाणिस्तानचा लाजिरवाणा पराभव

वेस्ट इंडिजचा दुसरा मोठा विजय

। फ्लोरिडा । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकाच्या शेवटच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा 104 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 16.2 षटकांत 114 धावांवरच सर्वबाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील धावांच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. 22 धावसंख्यावर वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला असला तरी त्यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांनी दुसर्‍या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी केली. जॉन्सन चार्ल्सने 27 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. तसेच, निकोलस पुरनने 53 चेंडूत 98 धावा केल्या आणि तो धावबाद झाला. वेस्ट इंडिजला 5 गडी गमावत 218 धावा करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला अफगाणिस्तान संघ या सामन्यात कधीच दिसला नाही. त्यांना सर्वात मोठा धक्का पहिल्याच षटकात बसला. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. या धावांचा पाठलाग करण्याची जबाबदारी पूर्णपणे गुरबाजच्या खांद्यावर होती. मात्र, तो बाद होताच सामना पूर्णपणे वेस्ट इंडिजच्या हातात गेला. इब्राहिम झद्रानने नक्कीच 28 चेंडूत 38 धावा केल्या पण त्याला उर्वरित फलंदाजांची साथ मिळाली नाही आणि संपूर्ण संघ 114 धावांवर सर्वबाद झाला.

निकोलस पुरनचे अग्नितांडव
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. निकोलस पूरनने 53 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकारांसह 98 धावा ठोकल्या. दरम्यान, अफगाणिस्तान संघासाठी अझमतुल्ला ओमरझाईने तिसरे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकोलस पुरनने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू नो बॉल ठरला, ज्यावर चौकार मारला. दडपणाखाली आलेल्या ओमरझाईने तिसरा चेंडू वाईड टाकला, जो चौकार गेला. अशाप्रकारे, पहिल्याच चेंडूवर अझमतुल्लाहने 16 धावा दिल्या. ओव्हरच्या दुसर्‍या चेंडूवर एकही धाव आली नाही. त्यानंतर तिसर्‍या आणि चौथ्या चेंडूवर पुरनने चौकार मारला आणि पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. अशा प्रकारे या षटकात एकूण 36 धावा आल्या. यापूर्वी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 36 धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची कमाल
वेस्ट इंडिजकडून ओबेद मॅकॉयने सर्वाधिक 3 बळी घेतले. यादरम्यान त्याने 3 षटकात 14 धावा दिल्या. याशिवाय अकील हुसेन आणि गुडकेश मोती यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तसेच, आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी ही प्रत्येकी 1 बळी घेतला.
Exit mobile version