। लाहोर। वृत्तसंस्था।
अफगाणिस्तानने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एका धक्कादायक विजयाची नोंद केली आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केल्यामुळे ‘ब’ गटातील सेमीफायनलचे गणित क्लिष्ट झाले आहे. पण या पराभवामुळे इंग्लंडचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान मात्र, संपुष्टात आले असून अफगाणिस्तानचा संघ अजूनही उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. अफगाणिस्तानकडून अझमतुल्ला उमरझाईने बळी घेतले तर इब्राहिम झादरानने 177 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानच्या आजच्या विजयाचे हे दोन खेळाडू हिरो ठरले.
इब्राहिम झद्रानचे (177) शानदार शतक आणि अझमतुल्ला ओमरझाई (41 धावा आणि 5 विकेट) याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लिश संघाचा अवघ्या 8 धावांच्या फरकाने पराभव केला. अखेरच्या दोन षटकांमध्ये म्हणजेच 12 चेंडूंत इंग्लंडला 16 धावांची गरज होती. फजलहकने त्या षटकात आर्चरला बाद करत 3 धावा दिल्या. तर अखेऱच्या षटकात उमरझाईने प्रत्येक चेंडूवर एकेक धाव देत पाचव्या चेंडूवर आदिल रशीदला बाद करत इंग्लिश संघाला सर्वबाद केले आणि संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली. पण अफगाणिस्तानने जोरदार पुनरागमन करत 325 धावा केल्या. झादरानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानसाठी पहिलं शतक झळकावलं आणि त्यानंतर या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळताना 177 धावा केल्या. अफगाणिस्तानने 9व्या षटकातच तीन गडी गमावले. स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने हे तिन्ही गडी बाद करत अफगाणिस्तानला अडचणीत आणले. पण इथून इंग्लंडच्या गोलंदाजीची अवस्था बिकट झाली आणि अफगाणिस्तानने पुनरागमन केले.
अफगाणिस्तानने 37 धावांत 3 गडी गमावल्यानंतर इब्राहिम झादरानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीबरोबर शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. शाहिदीने 40 धावा केल्या. तर यानंतर अझमतुल्ला ओमरझाईने 41 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानंतर मोहम्मद नबीने तर इंग्लिश संघाची धुलाई करत 24 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 40 धावा केल्या. झादरान आणि नबीने 200 च्या स्ट्राईक रेटने 50 चेंडूत शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. इंग्लंडकडून आर्चरने 3 बळी, ओव्हरटन, रशीदने प्रत्येकी 1 तर लिव्हिंगस्टोनने दोन बळी घेतले.
अफगाणिस्तानने दिलेल्या 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात आश्वासक झाली, पण दोन्ही सलामीवीर मोठी खेळी करू शकले नाही. सॉल्ट 12 धावा तर जेमी स्मिथ 9 धावा करत बाद झाले. जो रूटने 120 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाही.
हॅरी ब्रुक 25 धावा, बटलर 38 धावा, लिव्हिंगस्टोन 10 धावा तर ओव्हरटनने 32 धावा केल्या. पण अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे संघ 317 धावांवर सर्वबाद झाला.