| नवी मुंबई | प्रतिनिधी |
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ बाजारात नोव्हेंबर सुरुवातीलाच परदेशातील आफ्रिकन मलावी हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा परदेशी हापूस बाजारात दाखल होत असून या मलावी हापूसला देखील देवगड हापूस सारखीच गोडी असते. त्यामुळे बाजारात दाखल होतात, याला देखील मागणी वाढते. सध्या हा परदेशी मलावी हापूस बाजारात दाखल झाला नसल्यामुळे एपीएमसी या मलावी हापूसच्या प्रतीक्षेत आहे.
हापूस म्हटला की रत्नागिरी, देवगड हापूसची गोडी डोळ्यासमोर येते. देवगडचा हापूस अवीट गोडीसाठी साता समुद्रपार प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एपीएमसी बाजारात हा आफ्रिकेतील मलावी हापूसला वाढती मागणी आहे. नोव्हेंबर महिन्यात मालवी हापूस बाजारात दाखल होतो. मागील वर्षी हापूस 40 टनहून अधिक दाखल झाला होता.
दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी मधून 40 हजार हापूसच्या काड्या मलावीमध्ये नेवून लागवड करण्यात आलेली आहे. सुमारे 1400 एकरवर आंब्यांच्या काड्यापासून कलम तयार करून लागवड करण्यात आली होती. आता त्याला फळधारणा होत असून बाजारात मलावी आंबादेखील दाखल होत आहे. हापूसला उष्ण दमट हवामान लागते, नोव्हेंबरमध्ये मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला चांगली फळधारणा होते. त्यामुळे वर्षानुवर्षे आता हापूस सारख्याच चवीचा आंबा लवकर चाखायलव मिळत आहे. त्यामुळे हापूस प्रेमी देशी हापूस इतकेच परदेशी हापूसला पसंती देत आहेत.