| तळा | वार्ताहर |
आठवडा भराच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. ऑक्टोबर हिटनंतर हळूहळू हवेत गारवा निर्माण होऊन थंडीला सुरुवात झाली होती. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंड हवेमुळे दिलासा मिळाला होता. मात्र, फेंगल चक्रीवादळामुळे गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ज्यामुळे उकाड्यात तर वाढ झाली होती. शिवाय, वातावरणातील कोरडेपणासुद्धा वाढला होता. यामुळे काही दिवस थंडीमुळे समाधान पावलेले नागरिक शरीराला पुन्हा होत असलेल्या गर्मीने त्रस्त झाले होते. मात्र, आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्याने पुन्हा सर्वत्र कोरडे व शुष्क वारे वाहू लागले आहेत. ज्यामुळे तापमानात घट झाली असून, पुन्हा थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बाजारातील मागणी घटलेल्या थंडीतील कपड्यांना पुन्हा मागणी वाढली असून, पुन्हा हवेत गारवा जाणवू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.