तब्बल तीन वर्षानंतर मिनिट्रेन पुन्हा रुळावर

। माथेरान । वार्ताहर ।
पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन आज शनिवार दि.22 ऑक्टोबर पासून पुन्हा सेवेत येणार आहे. या मार्गावरील रुळांसह अन्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर ही गाडी धावणार आहे.या गाडीमुळे माथेरानमध्ये पुन्हा पर्यटनवृद्धीस मदत होणार आहे.यामुळे माथेरान मधील नागरिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

साल 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान मार्गावरील रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या मिनी ट्रेनचा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. आता या मार्गावर रूळ, ’क्रॅश बॅरियर’ याच्या सह अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. ही कामे पूर्ण होताच ट्रेनची दोन वेळा चाचणी घेण्यात आली.मिनिट्रेन ची चाचणी केल्यानंतर मिनीट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत येत आहे.असे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी गुरुवारी मिनीट्रेन मार्गाची पाहणीही केली.ते माथेरान मध्ये आले असता येथील सर्व राजकीय नेते मंडळींनी त्यांची आवर्जून भेट घेतली.आणि नेरळ-माथेरान -नेरळ मिनिट्रेन सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली होती.तसेच यासाठी काही नेतेमंडळींनी दिल्ली दौरे देखील केले होते.या सर्वांच्या प्रेयत्नातून ही मिनिट्रेन पर्यटकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येत आहे.या नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनमधून प्रवासाला दोन तास 40 मिनिटे लागणार आहेत.

दरम्यान, सध्या प्रवासी आणि पर्यटकांच्या सेवेसाठी नेरळ-माथेरान मार्गावरील अमन लॉज-माथेरान या दरम्यान शटल सेवा सुरू आहे.परंतु ही नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनिट्रेन सेवा सुरू होताच येथील अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या फेर्‍या कमी केल्या गेल्या आहेत.त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.निदान शनिवार आणि रविवारी तरी शटल सेवे च्या दहा फेर्‍या असाव्यात असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

मिनिट्रेन वेळापत्रक
डाऊन मार्ग : नेरळहून सकाळी 8.50 वाजता मिनी ट्रेन सुटून माथेरानला सकाळी 11.30 वाजता पोहोचेल, तर नेरळहून दुपारी 2.20 वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि माथेरानला सायकाळी 5 वाजता पोहोचेल.

अप मार्ग – माथेरानमधून दुपारी पावणेतीन वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि नेरळला सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल. माथेरानहून सायंकाळी 4.20 वाजता मिनी ट्रेन सुटून नेरळला सायंकाळी 7 वाजता गाडी पोहोचणार आहे.

Exit mobile version