दररोज दोन प्रवासी गाड्या
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेनची नेरळ- माथेरान- नेरळ प्रवासी सेवा शुक्रवार 6 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. माथेरान येथील पर्यटन व्यवसायासाठी ही सुचिन्ह समजले जात असून, तब्बल 20 दिवस उशिरा नेरळ- माथेरान- नेरळ मार्गावर मिनीट्रेनची प्रवासी सेवा सुरू होत आहे. दरम्यान, या मार्गावर दोनच प्रवासी फेऱ्या होणार असल्याने प्रवासी फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी पूर्ण झालेली नाही.
नेरळ येथून माथेरान साठी मिनीट्रेन सोडली जाते. नेरळ जंक्शन स्थानकातून 1907 मध्ये मिनी ट्रेन सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने दरवर्षी 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत या मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते. यावर्षी मे महिन्यात पाऊस आला आणि 15 जून रोजी पावसाळा अपेक्षित धरून बंद होणारी मिनी ट्रेन 26 मे पासून बंद करण्यात आली. त्यानंतर मोसमी पाऊस लांबला आणि 15 ऑक्टोबर रोजी नेरळ- माथेरान- नेरळ मिनीट्रेन पुन्हा आपला प्रवास सुरू करू शकली नव्हती. अजूनही सरता पाऊस सुरू असताना पर्यटक प्रवासी वर्गाची प्रचंड मागणी असल्याने मिनी ट्रेनच्या मार्गावर मालवाहू गाड्यांची चाचणी घेण्यात आली. त्या चाचणी मध्ये 28 ऑक्टोबर रोजी नेरळ येथून निघालेली मालवाहू गाडी कोणत्याही अडथळा विना पोहचली होती. त्यानंतर पुन्हा मालवाहू गाडी 2 नोव्हेंबर साठी पाठवण्यात आली आणि या मालवाहू गाडीचा प्रवास सुखरूप झाल्यानंतर नेरळ- माथेरान- नेरळ मिनी ट्रेनची प्रवास सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केला. त्यात शुक्रवार पासून दररोज दोन फेऱ्या या मार्गावर होणार आहेत.
तब्बल 20 दिवस उशिरा मिनीट्रेन सुरू होणार आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात नेरळ येथून सकाळी मालवाहू गाडी सोडली जाणार आहे. त्यानंतर नऊ वाजता पहिली तर साडे दहा वाजता दुसरी प्रवासी गाडी नेरळ येथून माथेरान साठी सोडली जाणार आहे. तर माथेरान येथून नेरळ साठी पहिली गाडी पावणे दोन वाजता आणि दुसरी गाडी चार वाजता साठी रवाना होणार आहे. त्या दोन्ही फेऱ्यांचा कार्यक्रम मध्य रेल्वे कडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन गाड्या वाढवून देण्याची अनेक वर्षाची मागणी आताही प्रलंबित आहे. मात्र, माथेरान ते अमन लॉज या दरम्यान शटल सेवा पूर्वीसारखी सुरू राहणार आहे.
नेरळ- माथेरान- नेरळ मार्गावर चालवल्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक
नेरळ येथून माथेरान साठी
सकाळी 08.50
सकाळी 10.25
माथेरान येथे पोहचणार
सकाळी 11.30
दुपारी 01.05
माथेरान येथून नेरळ साठी
दुपारी 02.45
दुपारी 04.00
नेरळ येथे पोहचणार
सायंकाळी 05.30
सायंकाळी 06.40
माथेरान अमन लॉज शटल सेवेचे वेळापत्रक
दररोज सहा फेऱ्या
शनिवार रविवार आठ फेऱ्या





