| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अलिबागसह दहा नगरपरिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर या नगरपरिषदांचा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. प्रशासाकडून त्याची हालचाल सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील नगरपरिषदांचा कार्यकाळ 2021 मध्ये संपला. तेव्हापासून नगर परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रशासनाद्वारे शहरांचा कारभार चालविला जात होता. नगरपरिषदांवर पूर्ण वेळ प्रशासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी काम पाहात होते. नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेल्याने गेली चार वर्षांपासून नगरपरिषदेचा कारभार प्रशासकामार्फत चालत होता. निवडणुका कधी होणार याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. अलिबाग नगरपरिषदेवर खुला महिला प्रवर्गाचे आरक्षण ठेवण्यात आले होते.
नगरपरिषदेच्या सदस्यपदांचे आरक्षण बुधवारी (दि.8) ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले. या आरक्षणामध्ये महिला व पुरुषांना समान संधी देण्यात आली आहे. त्यानंतर कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर नगरपरिषदेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा, महाड, श्रीवर्धन, पेण, उरण, माथेरान, खोपोली व कर्जत या नगरपरिषदांच्या सदस्यपदांच्या उमेदवारीचा अर्ज 10 नोव्हेंबरपासून भरण्यास सुरुवात होणार आहे.





