मतचोरीकडे दुर्लक्ष; निवडणुकीवर लक्ष
| मुंबई | प्रतिनिधी |
सदोष मतदारयाद्यांमुळे मतचोरी करुन महायुती सरकार सत्तेवर आल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे मतचोरी रोखण्यासाठी मतदारयाद्यांमधील घोळ आधी निस्तरण्यात यावा, त्यानंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत काढण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चातून करण्यात आली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले होते. परंतु, सत्ताधारी महायुतीपुढे लाचार झालेल्या आयोगाने जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत निवडणुका घेण्याचा डाव टाकला आहे, असा आरोप करण्यात येत आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्या आहेत. दुबार-तिबार मतदारांचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘डबल स्टार’चा फंडा पुढे आणला आहे. दरम्यान, याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात मागील सात वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 4) पत्रकार परिषद घेत राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत 1 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. त्यामुळे मंगळवारपासून संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून, त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
यंदा उमेदवरांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ
यंदा नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवरांसाठी खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा, तर क वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाखांची खर्चमर्यादा ठरवण्यात आली आहे. मतदारांच्या सुविधेसाठी एका खास ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.
कोणत्या विभागत किती नगरपरिषद, नगरपंचायती?
कोकण 17
नाशिक 49
पुणे 60
संभाजीनगर 52
अमरावती 45
नागपूर 55
महिलांसाठी खास गुलाबी मतदान केंद्र
निवडणूक आयोगाने यावेही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन बनवण्यात आल्याचही माहिती दिली. दिव्यांग मतदार, तान्ह्या बाळासह स्त्रिया, ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करु दिले जाईल. अनेक ठिकाणी गुलाबी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्व अधिकारी व कर्मचारी या महिला असतील.
31 ऑक्टोबरच्या यादीनुसार मतदान
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 55 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कंट्रोल युनिट्स स्थापन करण्यात आले आहेत.
दुबार मतदारांसमोर डबल स्टार येणार
दुबार मतदारांचा प्रश्न सोडविण्यासाठी एक टूल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील. या मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या मतदाराला त्या कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे, हे विचारले जाईल. त्यानंतर त्यांनी पसंती दर्शवलेल्या मतदान केंद्रांवर मतदान करता येईल. अशा प्रकारे दुबार मतदारांना एकाच मतदान केंद्रांवर मतदान करता येईल. संबंधितांनी काहीही संपर्क केला नाही, तर सगळ्या मतदान केंद्रांवर डबल स्टार मतदार अशी नोंद केली जाईल. त्यानंतर हा मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आला तर त्याच्याकडून मी दुसऱ्या कोणत्याही मदान केंद्रावर मतदान करणार नाही किंवा केले नाही, असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरावा लागेल
नगरपंचायतीत 1 सदस्य व 1 अध्यक्ष असतो. त्यामुळे त्यात मतदारांनी दोन मते द्यावी लागतील. नामनिर्देशन हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आयोगाने यासंबंधी एक पोर्टल तयार केले आहे. उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरता येतील. एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येतील. संकेतस्थहावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट संबंधित निवडणूक आधिकाऱ्यांकडे जाऊन जमा करावी लागेल. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. पण, ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करुन आपला अर्ज भरता येईल.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र - 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर
छाननी - 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख - 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप - 26 नोव्हेेंबर
मतदान - 2 डिसेंबर
निकाल - 3 डिसेंबर
एकूण किती मतदार?
एकूण मतदार - 1 कोटी 7 लाख 3 हजार 576
महिला मतदार - 53 लाख 22 हजार 870
नगरपालिका उमेदवारांसाठी खर्चमर्यादा किती?
अ वर्ग
अध्यक्षपद - 15 लाख, नगरसेवक - 5 लाख
ब वर्ग
अध्यक्षपद - 11 लाख 25 हजार, नगरसेवक - 3 लाख 50 हजार
क वर्ग
अध्यक्षपद - 7 लाख 50 हजार, नगरसेवक - 2 लाख 50 हजार
नगरपंचायत उमेदवारांसाठी खर्चमर्यादा किती?
अध्यक्षपद - 6 लाख, नगरसेवक - 2 लाख 25 हजार







