| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा अतिरिक्त कारभार राहुल देवांग यांच्याकडे होता. आता मात्र पूर्णवेळ अधिकारी या विभागाला प्राप्त झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक तेलंग यांना बढती मिळाली असून, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला.
गेल्या अनेक वर्षांपासून विनायक तेलंग हे बांधकाम विभागात काम करीत आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह पंचायत समिती अलिबाग बांधकाम विभागातदेखील काम केले आहे. त्यामुळे त्यांना अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याचा दांडगा अभ्यास आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पुलांची त्यांना चांगली माहिती आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे राऊत यांच्या सेवानिवृत्तीनंतर राहुल देवांग यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. गेली अनेक महिने ते कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहात होते. आता विनायक तेलंग हे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या पाच हजार किलोमीटरपैकी तीन हजार किलोमीटरचे रस्ते दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निधीअभावी हे रस्ते तयार करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता विनायक तेलंग ग्रामीण रस्ते दुरुस्त करण्यावर भर देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







