| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
स्वखर्चाने रस्ते तयार करून देण्याचे आश्वासन आमदार दळवी यांनी यापूर्वी दिले होते. मात्र, शासनाचा निधी असतानादेखील हा रस्ता पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचा प्रश्न कायम असून, आता या मार्गावरील पूल, साकवचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
अलिबाग-रोहा मार्गाच्या दुरवस्थेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हॅम योजनेतून जवळपासून 200 कोटी रुपयांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. ठेकेदाराचे सुमारे 14 कोटी रुपये थकल्याने हे काम बंद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून समोर आली आहे. अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी सुरुवातीला काम देण्यात आलेल्या ठेकेदाराने परवडत नसल्याचे कारण सांगून काम सोडून गेले. त्यानंतर दुसरा ठेकेदार नेमण्यात आला. मात्र, त्यानेही ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे काम केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकेदारांवर अंकुश राहिला नसल्याने अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावरील पुलांसह रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर पुलासह नांगरवाडी परिसरातील साकवची अवस्था बिकट झाली असताना सोमवारी सायंकाळी वढाव-खानाव येथील साकव (पूल) कोसळला. या दुर्घटनेमध्ये वावे येथील स्वप्नील गायकर हा तरुण जखमी झाला आहे. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची अवस्था बिकट झाली आहे. अपघात सातत्याने होत आहेत. या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या मार्गावरील प्रवाशांना खड्ड्यांचा प्रश्न कायमच भेडसावत असताना आता पूल व साकवच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठा गाजावाजा करीत रस्त्याचे काम करण्यास सुरुवात केली. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून हे काम पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरले आहेत.
अधीक्षक अभियंत्यांनी केली पुलाची पाहणी
पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले. अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पडलेल्या पुलाची पाहणी केली. हा पूल नव्याने उभारणी होईपर्यंत पर्यायी रस्त्याची विचारपूस केली. मात्र, पर्यायी मार्गावरील पुलांचीदेखील अवस्था बिकट असल्याने हा प्रश्न निर्माण झाला. मात्र, हा पूल तातडीने तयार करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्या आहेत.
गेल कंपनीला नोटीस बजावणार
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्ता कमी क्षमतेचा असून, येथील पुलांची (साकव) मोठ्या क्षमतेची अवजड वाहने पेलण्याची क्षमता नाही. तरीदेखील गेल कंपनीत येणारी अवजड वाहने या रस्त्यावरून धावत होती. गेल कंपनीच्या अवजड वाहनांच्या वर्दळीची परवानगी घेतली नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता यांना दिली. त्यामुळे अधीक्षक अभियंता यांनी कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत कंपनीला नोटीस बजावण्याची सूचना कार्यकारी अभियंता यांना दिली. पूल चांगल्या स्थितीत होता. मात्र, क्षमतेपेक्षा अवजड वाहने पुलावरून गेल्याने पूल कोसळल्याचे ते म्हणाले.
पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु
पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले. अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांनी याबाबत दखल घेत तातडीने ब्रेकरच्या मदतीने पुलावरील माती, खडी साफ करण्याबरोबरच लोखंडी पाईपच्या मदतीने पूल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून, हे काम दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वढाव-खानाव येथील पडलेल्या पुलाच्या जागी सध्या तात्पुरत्या स्वरुपात पाईपद्वारे पूल बांधण्याचे काम सुरु केले आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण केले आहे. खानाव येथून पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे. फक्त मोठ्या वाहनांना यातून प्रवेश दिला जाणार नाही.
मोनिका धायतडक,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग









