| मुंबई | प्रतिनिधी |
आज मुंबईत पुन्हा एकदा मोनो रेलचा अपघात झाला आहे. मुंबईतील वडाळा येथे चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेल ट्रेनच्या डब्याचा अपघात झाला. या मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकल्याने मोठा अपघात झाला. हा अपघात वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शनजवळ घडला. सुदैवाने यात प्रवासी नव्हते. त्यामुळे कोणीही जखमी झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचणी सुरू असताना आज बुधवार सकाळी वडाळा परिसरात मोनोरेलचा अपघात घडला. यावेळी ट्रायल रन सुरु असताना मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकला. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शनजवळी वडाळा डेपोजवळ हा अपघात घडला. यावेळी नवीन मोनोरेल रॅकचा एक डबा ट्रॅक बदलत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून खाली घसरला. तो बाजूला झुकून ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला. या अपघातामुळे ट्रेनचे अलाइनमेंट पूर्णपणे बिघडले आहे. सुदैवाने, या मोनोरेलमध्ये प्रवासी नव्हते. केवळ दोन तांत्रिक कर्मचारी या चाचणी प्रक्रियेत होते. एमएमएमओसीएल ने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली गेली. यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.







