| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
सुकापुर येथील सागर पॅलेस स्टॉक अप वाईन शॉप नं. 08 येथे आज सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल अग्निशमन केंद्रातून दोन अग्निशमन वाहने आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे फ्रिजला आग लागली आणि उष्णतेमुळे वाईनच्या काही बाटल्या फुटल्याने आग अधिक पसरली. अग्निशमन दलाने तत्परतेने ए.बी.सी. एक्सटिंग्विशरचा वापर करून तसेच मेन लाईट सप्लाय बंद करून होजरीलच्या साहाय्याने आग पूर्णतः विझवली. घटनास्थळी उपस्थित दुकान मालक अनिस सगर आणि मॅनेजर शिनु पंडित यांनी तत्काळ सहकार्य केले. दरम्यान, उप अग्निशमन अधिकारी संदीप पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. आग विझवण्याच्या मोहिमेत मंदार म्हात्रे तसेच अतुल तुपकरी, संदेश ठाकूर, श्रीकांत आढाऊ, आकाश दीक्षित, प्रतीक गाडगे, भावेश महाळुंगे, निमेश पावशे, सोनल गेंगजे, अमोल जाधव, अविनाश भालेराव आदी अग्निशमन कर्मचारी कार्यरत होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.






