राज्यात वटवाघूळांमध्ये आढळला विषाणू
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आणखी एका संकटानं चिंतेत भर घातली आहे. राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. वटवाघळांमध्ये विषाणू आढळून आल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.
मार्च 2020मध्ये सातर्यातील महाबळेश्वरमधील गुहेत हे वटवाघूळ सापडले आहेत. देशात याआधी काही राज्यात निपाह विषाणू आढळला होता पण राज्यात याआधी वटवाघळांमध्ये निपाह विषणू कधीही आढळला नव्हता. हा विषाणू वटवाघूळांमधून मानवाच्या शरिरात संक्रमित होतो, अशी माहिती याबाबत संशोधन करणार्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली आहे.
निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही लस किंवा औषध उपलब्ध झालं नाहीये. त्यामुळं हा विषाणू धोकादायक मानला जातो. हा विषाणूचा मृत्यूदरही अधिक आहे. औषध उपलब्ध नसल्यानं मृत्यूदर तब्बल 65 टक्क्यांच्या पुढे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते. करोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा करण्यात येत आहे.
भारतात यापूर्वी 2001मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात सिलिगुडी (पश्मिम बंगाल) येथे निपाहचे 66 रूग्ण आढळले होते. त्यापैकी 45 रूग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. तर, 2007मध्ये एप्रिल महिन्यात पश्निम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता.
निपाहची लक्षणे
प्रचंड ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी उलट्या, मन आखडणे, प्रकाशाची भीती वाटणे, मानसिक गोंधळ