| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |
मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेली मुदत संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला पुढील आंदोलन जड जाईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठ्यांचे पुढील आंदोलन कसे असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच जरांगेंचा ट्रॅक्टर मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, गावागावात मराठा आंदोलकांकडून ट्रॅक्टर्स व कार्यकर्ते घेऊन मुंबईत जाण्याची तयारी करण्यात येत आहे. हा मोर्चा सोलापूर , इंदापूर , पुणे , पनवेल , कल्याण , ठाणेमार्गे मुंबईतील मंत्रालयावर धडकणार असल्याचे सांगितले जात आहे.
24 डिसेंबरनंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. त्यासाठी 17 डिसेंबरला बैठक बोलवण्यात आली आहे. याच बैठकीत पुढील आंदोलना बाबत सविस्तर चर्चा होईल. आम्ही 24 डिसेंबरनंतर ही बैठक घेणार होतो. मात्र, काही घटनांनी सरकारवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव 17 डिसेंबरला बैठक घ्यावी लागत आहे. आमची फसवणूक झाली आहे. गुन्हे मागे घेतले नाहीत, लेखी देखील दिले नाही. मराठा समाज आता शांततेत आंदोलन करेल, कुठल्याही नेत्याला न जुमानता रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे जरांगे म्हणाले.