दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंनंतर शिंदे गटाचीही हायकोर्टात धाव

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबई महानगरपालिकेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनाही परवानगी नाकारली आहे. अशातच, आज शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, आता शिवाजी पार्कसाठी शिंदे गटानेही हायकोर्टात धाव घेतली आहेत.

शिंदे गटातर्फे शिवाजी पार्कसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपला शिंदे गट हीच आपली शिवसेना आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांकडे अशा प्रकारची परवानगी मागण्याचा कोणता अधिकार नाही. दरवर्षी शिवसेनेकडून सदा सरवणकर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मागत असतात. त्यामुळे त्यांचा अर्ज हा याचिकाकर्त्यांच्या आधी महानगरपालिकेकडे गेला आहे.

दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. असे म्हणत मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे. त्यासंदर्भात दोन्ही गटांना पत्रदेखील पाठवण्यात आलं आहे.

Exit mobile version