भरलेल्या घरांना पुन्हा लागली कुलपे
| तळा | प्रतिनिधी |
गेले आठ दिवस तळा तालुक्यातील घराघरात चैतन्य ओसंडून वाहत होते. गणेशोत्सवामुळे बंद दरवाजे सताड उघडे झाले होते. एका घरातून दुसऱ्या घरात माणसांची वर्दळ, गल्लीभर दरवळणारा मोदकांचा गोड सुवास आणि अंगणात लहान मुलांचा किलबिलाट…हजारो चाकरमान्यांमुळे ओस पडलेली घरे बोलकी झाली होती. पण बाप्पाच्या विसर्जनानंतर तीच बोलकी घरे पुन्हा अबोल झाली. घरादारांना पुन्हा कुलपे लागली आणि गावात स्मशान शांतता पसरली. तळा तालुक्यात गणेशोत्सव आणि होळी हे दोन सण म्हणजे चाकरमान्यांची दिवाळीच असते.
यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमानी कुटुंबासह गावी आले. सारा गाव माणसांनी फुलून गेला. सगळी घरे प्रकाशमय झाली. कुठे ढोलकीचा नाद, कुठे भजनाचा स्वर, कुठे बाल्या नाच तर कुठे गाव विकासाच्या सभा. शेजारी-पाजारी आनंदाने एकमेकांच्या घरी जात होते. ते चित्र पाहून गावपण खऱ्या अर्थाने जगल्यासारखे वाटत होते. मात्र, विसर्जन होताच चित्र पालटले. विसर्जनानंतर रविवारी केलेल्या मटण रश्श्याचा सुवास विरेपर्यंत चाकरमान्यांनी मुंबई-पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. एसटीच्या 53 विशेष गाड्यांमधून गावे रिकामी झाली. आता गावात उरली आहेत ती फक्त वयोवृद्ध माणसे आणि बंद घरांचा सुकसुकाट. हिच माणसे गावातच राहिली तर? हा प्रश्न आता वृद्धांच्या मनात घोळत आहे.
बाप्पाच्या आगमनामुळे रायगडच्या वेशीपासून ते थेट सिंधुदुर्गच्या टोकापर्यंतची नाती पुन्हा एकदा गावाकडच्या मातीशी घट्ट जोडली जात असून, अवघा कोकण प्रांत आता या महाउत्सवाच्या रंगात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे. शासनाने या वृद्ध पालकांच्या आर्त हाकेकडे लक्ष देऊन ग्रामीण भागात रोजगाराचीनिर्मिती करावी, हीच आता वृद्ध आई-वडीलांचे बाप्पाला साकडे आहे.
हाताला काम नाही
उद्योग नाही, व्यवसाय नाही. जोपर्यंत तळा तालुक्यात एखादा कारखाना, उद्योगधंदा येत नाही तोपर्यंत तरुणांना नोकरीसाठी मुंबई-पुण्याची वाट धरावीच लागणार. उद्योग आले तरच आमचा आनंद कायम टिकेल आणि गणेशोत्सवासारखी गावे वर्षभर फुललेली राहतील, अशी भावना ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
