कृषीवलच्या दणक्याने नवी मुंबई मनपा ताळ्यावर

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
नवी मुबंई पालिका हद्दीतील रस्त्यावर वाहन उभी करणार्‍या वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी वृक्षावर खिळे ठोकून ‘पे अँड पार्क’चे फलक लावल्याचे वृत्त कृषीवलच्या सात एप्रिलच्या अंकात असा ‘आम्ही काय केलाय गुन्हा’ या मथळ्याखाली छापण्यात आले होते. या वृत्तानंतर जाग आलेल्या नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून वृक्षावर खिळे ठोकून लावलेले फलक अखेर हटवले आहेत. मात्र हे फलक लावताना वृक्षाच्या खोडावर ठोकण्यात आलेले खिळे मात्र तसेच ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या या कारभारा बाबत वृक्ष प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई पालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर वाहन उभी करण्यासाठी पालिकेकडून खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.ज्या रस्त्यावर अशा प्रकारे वाहन उभी करण्यासाठी शुल्क वसुली करण्यात येते त्या रस्त्यांवर पालीके कडून शुल्क वसुली करण्यात येत असल्याची माहिती वाहनचालकांना व्हावी या करता संबंधित रस्त्यांवर पे अँड पार्क असा उल्लेख असलेले फलक लावण्यात आले आहेत. परंतु हे फलक लावताना परिसरातील वृक्षाच्या खोडावर खिळे ठोकून हे फलक लावण्यात आले असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागल्याने आणि या नाराजीची दखल घेत कृषीवलने वृत्त प्रसिद्ध केल्याने प्रशासनाकडून वृत्ताची दखल घेऊन खोडावरील फलक हटवले गेले आहेत.

कारवाई गुलदस्त्यात
वृक्षाच्या खोडावर खिळे ठोकून पे अँड पार्क ची जाहिरात बाजी करण्यात आलेली असल्यास या बाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नितीन नार्वेकर यांनी दिली होती.मात्र कोणत्या प्रकारे कारवाई करण्यात आली या बाबत माहिती घेण्यासाठी नार्वेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

खिळे जैसे थे
वृक्षाच्या खोडावर खिळे ठोकल्यास वृक्षाचे आयुष्मान कमी होते. याच कारणाने नवी मुंबई पालिका हद्दीतील वृक्षावर खिळे ठोकून लावलेले फलक हटवले. मात्र त्याचवेळी खिळे मात्र तसेच ठेवण्यात आले आहेत.

Exit mobile version