नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पैसे खात्यात जमा

युनियन बँकेच्या भोंगळ कारभाराचा पांगसे कुटुंबियांना मनस्ताप
| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरान येथील रहिवासी चंद्रकांत पांगसे व लक्ष्मी पांगसे या मायलेकांचे पैसै माथेरान युनियन बँकेच्या खात्यातून सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी खात्यातून न काढताच गायब झाले होते. यासाठी त्यांनी बँकेकडे सतत पाठपुरावा केल्याने बँकेने त्यांचे पैसै पुन्हा खात्यात जमा केले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना नऊ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मोलमजुरी करून या दोघा मायलेकांनी आपल्या निवृत्तीच्या कालावधीनंतर जीवन व्यवस्थित जगता यावे याकरिता माथेरानमधील युनियन बँकेची निवड करून पगारातून मिळणारी काही रक्कम बँकेत जमा करत राहिले. परंतु, दोघेही निरक्षर असल्याने बँकेत किती पैसे जमा आहेत याची कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळे एके दिवशी ज्या ठिकाणी ते काम करतात, तेथील मॅनेजर खटावकर यांनी बँकेतून पास बुक प्रिंट करून आणल्यावर चंद्रकांत पांगसे व लक्ष्मी पांगसे याच्या खात्यातून रक्कम न काढताच दोघांनीही पंधरा हजार रूपये खात्यातून काढल्याचे दाखवले. याबाबत दोघांकडे खटावकर यांनी विचारणा केल्यावर आम्ही पैसै काढलेच नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत खटावकर यांनी बँकेत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उतरे देण्यात आली. परंतु, त्यांनी प्रयत्न सोडले नाही. अखेर लक्ष्मी पांगसे यांच्या खात्यात तीन महिन्यांनंतर पंधरा हजार रुपये बँकेने जमा केले. परंतु, चंद्रकांत पांगसे यांचे पैसे जमा करण्याकरिता खटावकर यांना बँकेकडून रोज वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेली जात होती.

बँक मॅनेजर यांनी चंद्रकांत पांगसे यांनी आपल्या खात्यातून पैसै काढून नेलेत व माझ्याकडे सिसिटीव्ही फुटेजदेखील आहेत, तसेच त्याबाबतचे व्हाऊचरसुध्दा आहेत. सध्या बँकेत काम चालू असल्याने मी तुम्हाला सर्व माहिती नंतर दाखवतो, असे सांगून वेळ मारून नेली.

त्यानंतर काही काळाने बँकेचे लिपिक किरण कामावर हजर झाले व त्यांनी सांगितले की, चंद्रकांत पांगसे यांनी पैसै काढले पण, ते बँकेत विसरून गेले. कुणी तरी जबाबदार व्यक्ती सोबत आल्यावर आम्ही पुन्हा ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा करतो, असे खटावकर यांना त्यांनी सांगितले. त्यानंतर खटावकर ह्यांनी लिपिकास विचारले, मग सध्या ती रक्कम कुठे आहे. ह्यावर लिपिकाने ती रक्कम सध्या सेन्ड्री अकाऊंटला आहे. साहेब आले की जमा करतो. त्यानंतर 30 मे रोजी म्हणजेच सुमारे नऊ महिन्यानंतर चंद्रकांत पांगसे यांचे पैसे बँकेने त्यांच्या खात्यात जमा केले. पण सुमारे नऊ महिने हे पैसे होते कुठे? तसेच नऊ महिन्यांचे पांगसे यांचे व्याज बुडाले. ह्याला जबाबदार कोण? ह्या सर्व गोष्टींची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे.

Exit mobile version