नेरळचे दुय्यम निबंधक कार्यालय गल्लीत; सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात जमिनीची खरेदी विक्री करण्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे कर्जत येथे असलेले दुय्यम निबंधकांचे दुसरे कार्यालय नेरळ येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात महत्वाचे आर्थिक व्यवहार होत असतात. परंतु, आठ वर्षांचा कालावधी लोटला तरी या कार्यालयाला सरकारी जागा मिळालेली नाही. त्यामुळे या सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, एका भाड्याच्या जागेतून दुसऱ्या भाड्याच्या जागेत हे कार्यालय हलवले असून पूर्वी रस्त्याच्या अगदी बाजूला असलेले कार्यालय आता आडबाजूला नेण्यात आले आहे. येथील दुय्यम निबंधकांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याची चर्चा नेरळकरांमध्ये आहे.
कर्जत तालुक्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीचे पेव मागील 25 वर्षांत कायम आहेत. आता उरल्या सुरल्या जमिनींची विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत. त्यामुळे कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयाला तालुक्यात दोन कार्यालये बनवावी लागली आहेत. त्यातील नेरळ येथील कार्यालयात परवानगी नसलेल्या भूखंडांचे व्यवहार होत असतात. त्यामुळे नेरळ येथील दुय्यम निबंधक कार्यालय सतत गजबजलेले असते. हे कार्यालय गेले काही वर्षे कर्जत-कल्याण राज्यमार्गाच्या अगदी बाजूला सन्मान हॉटेल मधील पहिल्या मजल्यावर भाड्याच्या जागेत सुरू होते. नेरळ गावात महसूल विभागाचे अनेक भूखंड असून तेथे आर्थिक व्यवहार होणारे कायम स्वरूपी जागेत कार्यालय असायला हवे होते. मात्र, गेल्या सात-आठ वर्षात कार्यालय कायमस्वरूपी सरकारी जागेत ठेवण्याची कोणतीही तसदी दुय्यम निबंधक म्हणून येणाऱ्या अधिकारी वर्गाने दाखवली नाही. पूर्वीच्या कार्यालयाच्या काही अंतरावर नेरळ ग्रामपंचायत कार्यालय आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. मात्र, येथे देखील सरकारी जागेत कार्यालय हलवले गेले नाही.तर, नेरळ विकास संकुल प्राधिकरणाचे तीन मजल्याचे व्यापारी संकुल आहे. तेथे प्राधिकरण तांत्रिक अधिकारी यांचे कार्यालय आहे. मात्र, दुय्यम निबंधक कार्यालय मात्र भाड्याच्या जागेत का? हा प्रकार कोणालाही समजू शकला नाही. त्यानंतर सन्मान हॉटेलमध्ये हे कार्यालय अनेक वर्षे सुरू होते. त्या कार्यालयाच्या तळमजल्यावर मद्य विक्रीचा व्यवसाय असताना देखील त्याठिकाणी सह निबंधक कार्यालय सुरू असल्याचे आश्चर्य व्यक्त होत होते.
त्यानंतर आता या दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतरण नवीन जागेत करण्यात आले आहे. मात्र, ही नवीन जागा देखील भाड्याची असून हे ठिकाण अनेकांना गैरसोयीचे ठरणार आहे. हे कार्यालय मुख्य रस्त्यावरून आडबाजूला नेण्यात आले असून पत्ता शोधताना सर्वसामान्य लोकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याची चर्चा नेरळकरांमध्ये होत आहे. तसेच, दुय्यम निबंधक कार्यालयात होणारे आर्थिक व्यवहार लक्षात घेता ते कार्यालय सुरक्षित ठिकाणी आणि सरकारी जागेत असणे आवश्यक असते; परंतु, नेरळचे दुय्यम निबंधक कार्यालय हे सरकारी अधिकाऱ्यांना खासगी मालमत्ता वाटते काय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
अधिकाऱ्यांची टाळाटाळ
नेरळचे दुय्यम निबंधक कार्यालय हे आर्थिक व्यवहार करणारे कार्यालय असल्याने ते आडबाजूला गेल्याने लोकांची गैरसोय होणार आहे. यावर कृषीवलच्या प्रतिनिधीने संबंधित अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले. मात्र, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर न देता आपली जबाबदारी टाळण्याचे काम करताना दिसत आहेत. तसेच, आपले म्हणणे कॅमेरे समोर मांडण्याबाबत विचारले असता, कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्याचा आपल्याला अधिकार नसून याबाबत वरिष्ठ अधिकारी प्रतिक्रया देतील, असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले.
आम्हाला सरकारच्या गाईड लाईन्स आल्या आहेत. त्यानुसार जुन्या इमारतीमध्ये भाड्याने कार्यालय घेतले असल्यास त्याचे भाडे संबंधित इमारत जशी जुनी होईल तसे भाडे कमी व्हायला हवे, अशा सूचना आहेत. जुन्या ठिकाणी भाडे हे 33 हजार प्रति महिना होते. तर, नवीन ठिकाणी घेतलेल्या जागेचे भाडे 24 हजार एवढे असणार आहे. आम्ही शासनाची जमीन शोधत असून जागा सापडल्यास सरकारी जागेत कार्यालय उभे करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
-व्हि. जी. आंब्रजकर,
दुय्यम निबंधक







