सुषमा वाघमारे थेट सरपंच
शेकापचे नऊ पैकी सात सदस्य विजयी
| माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा ओळखल्या जाणार्या ग्रामपंचायतींपैकी देगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा आपला गड कायम राखीत शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होऊन थेट जनतेतून सरपंचपदी शेकापच्या सुषमा नितीन वाघमारे या 852 इतकी मते घेऊन विजयी झाल्या, तर 9 पैकी 7 सदस्य शेकापचे निवडून आले.
विजयी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, माजी राजिप अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी राजिप उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे, मोर्बा माजी सरपंच विलास गोठल, माजी उपसरपंच हसनमिया बंदरकर, निजाम फोपळूणकर, युवानेते नितीन वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
देगाव ग्रामपंचायतीची निवडणूक एक प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून तालुक्यात ओळखली जाते. या ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे शेकापचे वर्चस्व राहिले आहे. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. त्यानंतर सोमवार, दि.17 ऑक्टोबर रोजी सकाळी मतमोजणी प्रशासकीय भवन माणगाव येथील सभागृहात माणगाव तालुक्याचे नायब तहसीलदार बी.वाय. भाबड यांच्या अधिपत्याखाली झाली.
देगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी थेट जनतेतून शेकापच्या सुषमा नितीन वाघमारे यांनी 852 इतके मते घेऊन त्या विजयी झाल्या. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकांक्षा विनोद म्हसकर यांना 508 मते मिळाली. सदस्यपदी शेकापच्या सोनाली मर्चंडे, दिनेश गुगळे, संदीप पवार हे निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर निवडून आले. तर संस्कृती शेलार, श्वेता गुगळे, योगिता शिगवण, लक्ष्मी कोळी या बिनविरोध निवडून आल्या. असे एकूण सरपंचपदासह सात सदस्य शेकापचे निवडून आल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले.
यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना रमेश मोरे म्हणाले की, सरपंच व सदस्यांचा झालेला विजय हा विकासकामांमुळे झाला आहे. आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, आस्वाद पाटील, अस्लम राऊत, माजी राजिप सदस्या आरती मोरे यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत दोन ते अडीच कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. याची पोचपावती शेकापला मिळाली आहे.
पन्हळघर बु.शिंदे गट, तर पन्हळघर खुर्द ठाकरे गटाकडे
पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेनेने बाजी मारीत थेट जनतेतून सरपंचपदी संतोष सीताराम वातेरे हे 242 इतके मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश तुकाराम भोनकर यांना 153 इतकी मते पडली. या पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे करुणा नितेश जाधव, सुजन सुभाष शिगवण, विजया रवी वातेरे, प्रमोद सीताराम नवाले, गेनी गंपू हिलम हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून येऊन मतदानानंतर शिंदे गटाचे भारती सुरेश मळेकर, महेश टिकम धाडवे हे निवडून आले.
तर पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिंकली असून, सरपंचपदी थेट जनतेतून उद्धव ठाकरे गटाचे हारदास दौलत शेडगे हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून कीर्ती तुकाराम शिंदे, अस्मिता अशोक करकरे, रमेश येटू जाधव, प्रभाग क्रमांक 2 मधून रामा बाबू झोरे, आरती रामचंद्र झोरे, प्रभाग क्रमांक 3 मधून नंदा बयाजी करकरे, दिलीप बाळू करकरे हे उमेदवार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सरपंच हारदास शेडगे व निवडून आलेले सदस्य यांचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे,माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी,लोणेरेचे माजी सरपंच प्रभाकर ढेपे,माणगावचे नगरसेवक अजित तारळेकर व सहकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.