रेवदंडा बसस्थानक समस्यांचे आगर

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग आगाराच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या रेवदंडा बस स्थानक समस्यांचे आगर बनले आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकारी, कर्मचारी, प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे, मात्र या समस्या सोडविण्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

बस स्थानकाच्या मुख्य इमारतीची काही ठिकाणी पडझड झाली आहे. खिडक्यांची तावदाने, दरवाजाची स्थिती दयनीय आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी असली तरी तिच्यासमोर कचरा साचला आहे. मागील बाजूला घाणीचे साम्राज्य पसरलेले असून बाह्यवळण मार्गाकडे जाणार्‍या रस्त्याची उंची वाढल्याने पर्जन्यवृष्टीत बस स्थानकाला डबक्याचे स्वरूप प्राप्त होते. बस स्थानकात दर्शनी व मागील बाजूला खड्डे पडले असून खड्ड्यांत लालपरीच्या चाकाचा भाग रूतत असल्याने बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अलिबाग आगाराने रेवदंडा बस स्थानकातून रेवदंडा, चौल, नागाव व आक्षी या भागातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या लालपरी बंद करून वेठीस धरले आहे. मुरूड आगारातून येत असलेल्या लालपरी प्रवाशांनी भरून येत असल्याने वरील चार ठिकाणांच्या प्रवाशांना अलिबाग येथे खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यात आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो व वेळेचा अपव्यय होतो. आगारातील चौकशीकक्ष बहुतांशी वेळा बंद असतो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेवदंडा आगारातील समस्यांबाबत अलिबाग आगारप्रमुख यांना लेखी पत्र दिले असून त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आश्‍वासन दिले आहे.

देवराज राऊत,
वाहतूक नियंत्रक, रेवदंडा बसस्थानक

Exit mobile version